भारतीय संविधान बदलण्याचा रा.स्व. संघाचा प्रयत्न हाणून पाडा - आ. अबु आझमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 December 2016

भारतीय संविधान बदलण्याचा रा.स्व. संघाचा प्रयत्न हाणून पाडा - आ. अबु आझमी

मुंबई: 26 डिसेंबर 2016 = 
एक हजार वर्षानंतर आपले सरकार आले, हे सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान म्हणजे भाजपचे सरकार आरएसएसच्या इशाऱ्यावरच चालते ही बाब स्पष्ट करणारे आहे. भाजपच्या मुखवट्या आडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघच आपला जातीयवादी अजेंडा राबवत असल्याचा आरोप समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.. अबु असीम आझमी यांनी केला आहे. सरसंघचालकांच्या या वक्तव्यावर भाजपने अधिकृतपणे खुलासा करावा, अशी मागणी करत घरवापसीबद्दल सरसंघचालकांनी केलेल्या वक्तव्याचाही त्यांची चांगलाच समाचार घेतला. आणि संविधान बदलु पाहणाऱ्या या जातियवादी सरकारला मुळापासून उखडून फेका, असे आवाहनही आझमी यांनी केले. 

नागपुर येथील एका कार्यक्रमात बोलताना, सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक हजार वर्षानंतर आता आपले सरकार आल्याचा दावा केला होता. भागवतांच्या या वक्तव्यावर बोलताना मा. आझमी म्हणाले की, स्वतंत्र भारतात अशा पद्धतीने जातीयवादी वक्तव्य करणे म्हणजे डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला दिलेल्या संविधानावर अविश्वास दाखवण्यासारखे आहे. त्यामुळे अशा जातीयवादी विचारांच्या आधारे चालणाऱ्या सरकारला उखडून फेकून देण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच भागवतांचे वक्तव्य ग्राह्य मानले, तर आदर्श राज्य कारभार करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यालाही भागवत आपले मानत नाहीत असेच म्हणाले लागेल, असेही आझमी म्हणाले.

हिंदू धर्मातून बाहेर गेलेल्यांची घरवापसी करण्याबाबत भागवतांच्या विधानाचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. या देशात २५ कोटी मुस्लिम जनता राहते. भारतीय संविधानानुसार १८ वर्षे पुर्ण झालेल्या प्रत्येक सज्ञान व्यक्तीला काही मूलभूत अधिकार बहाल करण्यात आले आहेत. एखाद्या धर्माचे आचार विचार एखाद्या व्यक्तीला पटल्यास तिला धर्मांतर करण्याचे स्वातंत्र्यसुद्धा भारतीय संविधानाने दिले आहे. त्यामुळे घरवापसी करुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संविधान बदलण्याचा प्रयत्नात आहे का? तसेच फक्त हिंदू धर्मातून मुस्लिम धर्मातच धर्मांतर होते हा समज चुकीचा असून अनेक मुस्लिम लोकही धर्मांतर करुन हिंदू धर्मात गेले आहेत,त्यांचे भागवत काय करणार आहेत, असा सवालही त्यांनी यावेळी केला. एकूणच भारतीय संविधानानुसार आपल्याला आपले जातीयवादी ध्येय गाठता येणार नाही,याची कल्पना अाल्याने डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या संविधानालाच धक्का पोहोचवण्याचा यांचा प्रयत्न असल्याचा आरोप करून या जातीयवादी विचारांच्या सरकारला उखडून फेका, असे आवाहनही त्यांनी केले.

Post Bottom Ad