'प्रियदर्शिनी पार्क' महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची नोटीस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 December 2016

'प्रियदर्शिनी पार्क' महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची नोटीस

मुंबई - बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील मलबार हिल परिसरातील लेडी लक्ष्मीबाई जगमोहनदास मार्गावरील (Nepean Sea Road) महापालिकेच्या जागेवर असणारे 'प्रियदर्शिनी पार्क' हे परिरक्षणासाठी 'मे. मलबार सिटीझन्स फोरम' या संस्थेला देण्यात आले होते. तथापि, या ठिकाणी विनापरवानगी शेडचे बांधकाम करणे, दुकान चालविण्यास विनापरवानगी ना-हरकत प्रमाणपत्र देणे, विनापरवानगी जॉगिंग ट्रॅक तयार करणे, तसेच महापालिकेची परवानगी न घेता जागेचा व्यवसायिक वापर करणे यासारख्या विविध बाबींद्वारे करारातील अटी व शर्तींचा भंग केल्यामुळे सदर जागा महापालिकेकडे परत करण्याबाबतची नोटीस महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे दि. २३ डिसेंबर २०१६ रोजी बजावण्यात आली आहे. 
मलबार परिसरातील सुमारे ६५ हजार चौ.मी. एवढी महापालिकेची जागा ५ जुलै १९८५ रोजी करण्यात आलेल्या एका करारानुसार 'मे. मलबार सिटीझन्स फोरम' या संस्थेला देण्यात आली होती. मात्र सदर करारामध्ये नमूद करण्यात आलेल्या अटी व शर्तींचा भंग करण्यात आल्याचे आढळून आल्याने सदर जागा महापालिकेकडे परत देण्याबाबत संबंधित संस्थेला नोटीस बजावण्यात आली आहे.

'प्रियदर्शिनी पार्क'च्या प्रवेशद्वाराजवळ एक पत्र्याचे शेड महापालिकेची परवानगी न घेता बांधण्यात आले आहे. या शेडचा उपयोग संबंधित संस्थेच्या कार्यालयासाठी होत असल्याचे आढळून आले आहे. याव्यतिरिक्त अजून एक पत्राशेड विनापरवानगी बांधण्यात आले असून त्याचा उपयोग शितपेय व खाद्यपदार्थ विक्रीच्या दुकानासाठी होत असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे सदर शितपेय व खाद्यपदार्थांच्या दुकानांसाठी महापालिकेची परवानगी न घेता संबंधित संस्थेद्वारे ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

'प्रियदर्शिनी पार्क' मध्ये महापालिकेची परवानगी न घेता जॉगिंग ट्रॅक बांधणे, यासह विविध कामे विनापरवानगी करण्यात आली आहेत. ही कामे करण्यासाठी सार्वजनिक निधींचा वापर करण्यात आला असला, तरी संबंधित संस्थेद्वारे या उपयोगितांच्या वापरासाठी नागरिकांकडून भरभक्कम शुल्क आकारणी करण्यात येत असल्याचेही आढळून आले आहे.

या जागेवरील समुद्र किना-यालगतच्या भागात व्यायामशाळा,मनोरंजन सभागृह यासारखी बांधकामे महापालिकेकडून कोणतीही परवानगी / मान्यता न घेता करण्यात आली आहेत. महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता जागेचा व्यवसायिक वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर संस्थेकडे मालमत्ता खात्याची १९९२ पासूनची थकबाकी असून ही रक्कम साधारणपणे रुपये २ कोटी २१ लाखांपेक्षा अधिक आहे.

मलबार हिल परिसरातील नागरी सेवा सुविधांची आवश्यकता लक्षात घेऊन या संस्थेला देण्यात आलेल्या ६५ हजार चौरस मीटर जागेपैकी सुमारे ६०८ चौ.मी. एवढी जागा पोस्ट ऑफीसकरीता तर सुमारे ४ हजार ९८ चौ.मी. एवढी जागा मुंबई अग्निशमन दलाच्या सेवा सुविधांसाठी आरक्षित करण्यात आली होती. तथापि, हे आरक्षण रद्द करण्याबाबत मा. उच्च न्यायालायाच्या स्तरावर संबंधित संस्थेने याचिका दाखल केली असून सदर प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे

महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार उद्यान / क्रीडांगण / मनोरंजन मैदानासाठी आरक्षित असणारे २१६ भूखंड महापालिकेने स्वयंसेवी संस्थांना दत्तक तत्वावर दिले होते. गेल्या काही महिन्यांमध्ये यापैकी १४१ भूखंड /उद्याने / क्रीडांणगे / मनोरंजन मैदाने महापालिकेने परत घेतले असून ७५ भूखंड महापालिकेकडे परत येणे अद्याप बाकी आहेत. याबाबतची प्रक्रिया सध्या सुरु आहे. या ७५ भूखंडांमध्ये 'प्रियदर्शिनी पार्क'चा देखील समावेश आहे.

Post Bottom Ad