एफ दक्षिण विभागातील सोसायटींमध्ये पर्यावरण पूरक प्रकल्प - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 December 2016

एफ दक्षिण विभागातील सोसायटींमध्ये पर्यावरण पूरक प्रकल्प

दररोज एक लाख लीटर पाण्याच्या पुनर्वापरासह सेंद्रीय खत निर्मिती
मुंबई / प्रतिनिधी
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात नव्याने उभ्या राहणा-या इमारतींमध्ये इमारतीतील सांडपाण्याचे शुद्धीकरण करुन त्याचा पुनर्वापर करणे, तसेच सोसायटीच्या स्तरावर ओल्या कच-याचे विघटन करुन त्यापासून सेंद्रीय खताची निर्मिती करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यानुसार एफ दक्षिण विभाग क्षेत्रातील करी रोड स्टेशन जवळ असणा-या महादेव पालव मार्गावरील 'विघ्नहर्ता' आणि शिवडी परिसरातील टोकेरशी जिवराज मार्गावरील 'अशोका गार्डन' या उंच इमारतींच्या परिसरात महापालिकेच्या नियमांनुसार पाणी पुनर्वापर विषयक व कचरा व्यवस्थापन विषयक प्रकल्प यशस्वीपणे राबविले जात आहेत. यानुसार 'विघ्नहर्ता' मध्ये दररोज एक लाख लीटर पाण्यावर प्रक्रिया करुन व त्याचे शुद्धीकरण केले जात आहे; तर ४३५ सदनिका असणा-या 'अशोका गार्डन' मध्ये सुयोग्य कच्ररा व्यवस्थापन केले जात असल्याने येथून दररोज केवळ २० किलो एवढाच कचरा महापालिकेच्या वाहनांना दिला जात आहे, अशी माहिती एफ दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी दिली आहे.


दररोज एक लाख लीटर पाणी पुनर्वापरायोग्य: 'विघ्नहर्ता' इमारत समूहातील सांडपाण्याचा पिण्याव्यतिरिक्तच्या इतर कामांसाठी वापर करता यावा, यादृष्टीने या परिसरात सांडपाणी पुनर्वापर व शुध्दिकरणाचा प्रकल्प चालू करण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये दररोज सुमारे एक लाख लिटर इतके सांडपाणी / मलप्रवाह याचे शुध्दिकरण करुन ते पुनर्चक्रांकित (Recycled) पाणी परिसरातील बगीचामध्ये, शौचालयासाठी वा इतर पिण्याव्यतिरिक्तच्या कामांसाठी वापरले जात आहे.

'विघ्नहर्ता' व 'अशोका गार्डन' या इमारती समुहांच्या परिसरात बगीच्या मधील पाला पाचोळयापासून / घरातील टाकाऊ कच-याचे वर्गीकरण करुन विघटन होणा-या कच-यापासून सेंद्रीय खताची निर्मिती करण्याचे काम चालू आहे.

'अशोका गार्डन' या इमारती समुहांच्या परिसरात ४३५ सदनिका आहेत. या प्रत्येक सदनिकेत तयार होणार कचरा हा ओला व सुका वेगळा करुन एकत्र केला जातो. नंतर हा कचरा त्यातील कच-याच्या प्रकारानुसार वेगळा केला जातो व त्यातील विघटनशील ओल्या कच-यापासून सेंद्रीय खताची निर्मिती केली जाते. कच-यापासून सेंद्रीय खताची निर्मिती करण्यासाठी 'अशोका गार्डन' परिसरात 'जैविक खत कनव्हर्टर' बसविण्यात आले असून यातून दररोज साधारणपणे २५ किलो एवढ्या प्रमाणात तयार होणारे खत 'अशोका गार्डन' परिसरातील झाडांना प्राधान्याने वापरण्यात येते.

'अशोका गार्डन' या इमारती समुहांच्या परिसरात ४३५ सदनिका आहेत. या परिसरात अतिशय सुयोग्यप्रकारे कचरा व्यवस्थापन केले जात असल्याने दररोज साधारणपणे २० किलो एवढाच कचरा महापालिकेच्या वाहनांना दिला जातो.

एफ दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी सांगीतले की, 'अशोका गार्डन' मध्ये करण्यात येत असलेले अतिशय चांगल्या प्रकारचे कचराव्यवस्थापन व 'विघ्नहर्ता' इमारत समुहांच्या परिसरात करण्यात येत असलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर यासारखे प्रकल्प सोसायटींच्या स्तरावर त्यांच्याच पुढाकाराने व खर्चाने केले जात आहेत. या प्रकल्पांच्या धर्तीवर इतर सोसायटींनी देखील आपल्या स्तरावर प्रकल्प राबवून महापालिकेला सहकार्य करण्यासोबतच पर्यावरण पूरकता जपावी, असे आवाहन देखील मोटे यांनी केले आहे

Post Bottom Ad