चैत्यभूमी आता “अ” वर्ग तीर्थक्षेत्र-पर्यटनस्थळ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 December 2016

चैत्यभूमी आता “अ” वर्ग तीर्थक्षेत्र-पर्यटनस्थळ

मुंबई, दि. 2 Dec 2016 : लक्षावधी आंबेडकरी अनुयायांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील चैत्यभूमीला “अ” वर्ग तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर हा महत्वपूर्ण निर्णय घेऊन राज्य सरकारने या महामानवास अनोखी आदरांजली वाहिली आहे.
देशातील आंबेडकरी अनुयायांसाठी चैत्यभूमी आणि दीक्षाभूमी ही दोन क्षेत्रे अतिशय महत्वाची व श्रद्धेची आहेत. राज्य सरकारने यापूर्वीच नागपूर येथील दीक्षा भूमीस “अ” वर्ग पर्यटनस्थळ आणि तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापाठोपाठच आता दादरमधील चैत्यभूमीस अ वर्ग तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याचा निर्णय घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित दोन्ही महत्वपूर्ण ठिकाणांचा सन्मान करतांना त्यांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग प्रशस्त केला आहे. दीक्षाभूमीवर बाबासाहेबांनी आपल्या लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. तर दादरमधील चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अखेरचा निरोप देण्यात आला होता.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षात राज्य सरकारने लंडनमध्ये शिकत असतांना बाबासाहेबांचे वास्तव्य असलेले घर विकत घेऊन त्याचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच जपानमधील कोयासन विद्यापीठातही बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण करण्यात आले आहे. इंदू मिलच्या जागेवरील बाबासाहेबांच्या भव्य स्मारकाच्या कामाला सुरुवातही झाली आहे. येत्या 6 डिसेंबरला बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन असून त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेऊन राज्य सरकारने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी आदरांजली वाहिली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS