आग पिडीतांना दिलासा देण्यासाठी अबु आझमींचा यशस्वी पाठपुरावा
नागपूर : 8 डिसेंबर
मानखुर्द – शिवाजीनगर परिसरातील रफिकनगर येथील झोपडपट्टीला लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या पिडीतांना आर्थिक मदत करण्यासंदर्भात समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. अबु असिम आझमी यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आगीबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविला असून पिडीतांना योग्य ती आर्थिक मदत देण्याचे आश्वासन आझमी यांना दिले आहे.

गेल्या आठवड्यात शुक्रवार दिनांक २ डिसेंबर रोजी विजेच्या तांत्रिक बिघाडामुळे रफिक नगर झोपडपट्टीत आग लागली होती. या आगीमध्ये तब्बल पन्नासच्या आसपास झोपड्या पुर्णपणे जळून खाक झाल्या होत्या. यामध्ये पिडीतांचा संपुर्ण संसार तर उध्वस्त झाला आहेच, शिवाय त्यांच्याकडे असलेले रहिवासासंदर्भातील सर्व पुरावेही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून नष्ट झाले आहेत. ही बाब मा. आझमी यांनी एका अर्जाद्वारे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणली. काही दिवसांपुर्वी मुंबईतील वांद्रे येथील झोपडपट्टीत लागलेल्या आगीतही अशाच पद्धतीने झोपड्या भस्मसात झाल्या होत्या. त्यावेळी त्या आगीतील पिडीतांना मुख्यमंत्री निधीतून प्रत्येकी पंचवीस हजारांची मदत करण्यात आली होती. या मुद्द्याकडेही मा. आझमी यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधत रफिकनगर येथील पिडीतांनाही अशाच पद्धतीने मुख्यमंत्री निधीतून आर्थिक मदत करण्याची मागणी केली. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आगीबाबतचा अहवाल देण्याचे आदेश दिले असून पिडीतांना शक्य ती सर्व आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.