. रात्रीचे जेवण व सकाळची न्याहारी यातील कालावधी कमी करण्याच्या सूचना
· विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षेबाबत आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी महिला अधिकाऱ्यांच्या पथकामार्फत आश्रमशाळांची तपासणी
· डासांपासून होणारे आजार कमी करण्यासाठी सर्व आश्रमशाळांमध्ये मच्छरदाण्या
मुंबई, दि. 22 : राज्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे मृत्यू रोखण्यासाठी आदिवासी विकास विभागाने केलेल्या उपाययोजनांचा राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी गुरुवारी (दिनांक 22) राजभवन येथे एक उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला.
बैठकीला आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, आदिवासी विभागाचे सचिव राजगोपाल देवरा,कुटुंब कल्याण आयुक्त डॉ. प्रदीप व्यास, आरोग्य विभागाचे संचालक डॉ सतीश पवार तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आश्रम शाळेतील मुलांच्या रात्रीच्या जेवणातील तसेच सकाळच्या न्याहारीमधील कालावधी कमी करण्यासंदर्भात साळुंके समितीच्या शिफारसीबाबत शासनाच्या वतीने आदिवासी आयुक्तांना सूचना देण्यात आल्या असल्याचे आदिवासी विकास विभागाचे सचिव राजगोपाल देवरा यांनी राज्यपालांना सांगितले.
विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षेबाबत आत्मविश्वास निर्माण करण्याच्या दृष्टीने सर्व आश्रमशाळांमध्ये महिला अधिकाऱ्यांच्या पथकाने प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असून या संदर्भात स्थायी व्यवस्था निर्माण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रकल्प अधिकारी तसेच जिल्हा स्तरावर विविध विभागांमध्ये समन्वय तसेच सुसूत्रता असावी या दृष्टीने शासन प्रयत्नशील असून लवकरच या संदर्भात शासन निर्णय जारी करण्यात येणार असल्याची माहिती देवरा यांनी यावेळी दिली.
सर्व आश्रमशाळांमध्ये 108 क्रमांकाची आपत्कालीन वैद्यकीय सुविधा पुरविणारी रुग्णवाहिकेची सोय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याबाबत शासन स्तरावर विचार सुरु असून अशा सुविधेबाबत फलक आश्रमशाळांमध्ये दर्शनीय भागात लावण्यात आले असल्याची त्यांनी माहिती दिली. अम्बुलंसच्या माध्यमातून केवळ आपत्कालीन सेवा न देता आरोग्य सेवाही पुरविण्यात याव्यात अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
डासांपासून होणारे आजार रोखण्यासाठी सर्व आश्रम शाळांमध्ये मच्छरदाण्या पुरविण्याबाबत आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचित करण्यात आले असून बहुतेक आश्रमशाळांमध्ये मच्छरदाण्या बसविण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व आश्रमशाळांमध्ये आरोग्य सेविकेची (ANM) ची पदे निर्माण करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.