मुंबई, दि. 20 : पॅकबंद वस्तूंची छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री केल्याप्रकरणी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील चार हॉटेल/रेस्टॉरंट आणि दुकानांविरुद्ध वैध मापन शास्त्र यंत्रणेने खटले दाखल केले आहेत. तसेच विमानतळ परिसरातील दुकानांमधून छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्रीस प्रतिबंध घालण्याच्या सूचना यंत्रणेने संबंधित विमानतळ प्राधिकरण व मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि. यांना पत्राद्वारे कळविले आहे,अशी माहिती वैध मापन शास्त्र नियंत्रक तथा विशेष पोलीस महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये छापील किमतीपेक्षा जास्त दराने वस्तूंची विक्री होत असल्याच्या तक्रारीनंतर वैध मापन शास्त्र यंत्रणनेने विमानतळावरील सप्तगिरी रेस्टॉरंट प्रा. लि., फ्लेमिंगो एअरपोर्ट रिटेल लि., सेफ बॅग रॅप लिमिटेड, देवयानी एअरपोर्ट सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्यावर छापील किमतीपेक्षा जास्त दराने पॅकबंद वस्तूंची विक्री केल्याप्रकरणी खटले दाखल केले आहेत.
छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री केल्याबद्दल हॉटेल व रेस्टॉरंट यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविण्यात आली आहे. तसेच एकाच प्रकारच्या आवेष्टित वस्तूंवर दोन किमती असू नयेत, अशा सूचना नवी दिल्ली येथून वैधमापन शास्त्र संचालकांनी दिल्या आहेत. यासंबंधी इंडियन हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन,हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन (पश्चिम विभाग) आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रा. लिमिटेड यांना या सूचनांचे पालन करण्यासंबंधी पत्राद्वारे कळविण्यात आले आहे, अशी माहिती गुप्ता यांनी दिली.
आवेष्टित वस्तूंची विक्री छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणे ही ग्राहकांची फसवणूक असून असे प्रकार टाळण्यासाठी विक्रेत्यांना योग्य त्या सूचना देण्याचे व विक्रेत्यासोबत करारनामा करताना वैधमापन शास्त्र अधिनियम व अंतर्गत नियमांचे पालन करण्याच्या स्पष्ट सूचना त्यामध्ये करण्याचे निर्देश वैध मापन शास्त्र यंत्रणेने मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लिमिटेड यांना कळविले आहे, असेही गुप्ता यांनी सांगितले आहे.
याबाबत तक्रार असल्यास वैध मापन यंत्रणेच्या नियंत्रण कक्षाचा दुरध्वनी क्र. (022-22886666) किंवा ईमेल dclmms@yahoo.in किंवा dclmms_complaints@yahoo.com, dyclmmumbai@yahoo.in,dyclmkokan@yahoo.in, dyclmnashik@yahoo.com,dyclmpune@yahoo.in, dyclmaurangabad@yahoo.in,dyclmamravati@yahoo.in, dyclmnagpur@yahoo.in या ईमेल पत्त्यावर तक्रारी नोंदवाव्यात,असे आवाहन गुप्ता यांनी पत्रकाद्वारे केले आहे.