नागपूर, दि. 16 Dec : मच्छिमारांच्या बोटी उभ्या करण्यासाठी आवश्यक असणारे ओटे तयार करणे, मासे सुकविणे व इतर कारणांसाठी आवश्यक असणाऱ्या वन जमिनीचा प्रस्ताव संबंधित विभागाकडून वन विभागास प्राप्त झाल्यास त्यावर सकारात्मक विचार करण्यात येईल, अशी माहिती वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत दिली.
मौजे नवानगर, ता. गुहागर, जि. रत्नागिरी येथील पडिक जमीन मच्छिमार बांधवांना उपलब्ध करुन देण्याबाबतचा प्रश्न सदस्य भास्कर जाधव यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, मच्छिमारांना त्यांच्या व्यवसायासाठी वन विभागाकडील 15 ते 20 गुंठे क्षेत्राची आवश्यकता असते. याबाबत ग्रामस्थ अथवा अन्य यंत्रणेकडून वन (संवर्धन) अधिनियमांतर्गत वनेतर वापराकरिता वनजमिनीच्या मागणीचा प्रस्ताव प्राप्त झाल्यास याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. तसेच मच्छिमारीतून रोजगार निर्मितीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. वन विभागाने मच्छिमारीसाठी जाळी (Net) विकसित केली आहे. त्याही बदलून देण्यात येतील. तसेच मच्छीमारांना किनाऱ्यावर बोटी लावणे, मासे सुकविणे यासाठी आवश्यक जागाही उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.