मुंबईत जानेवारीला बहुजन क्रांती मूक महामोर्चा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 December 2016

मुंबईत जानेवारीला बहुजन क्रांती मूक महामोर्चा

मुंबई / अजेयकुमार जाधव 
दलित, ओबीसी, आदिवासी, भटके विमुक्त, अल्पसंख्यांक समाजाला भारतीय संविधानाने सामाजिक न्यायासाठी बहाल केलेले हक्क आणि भविष्यात त्यासाठी कराव्या लागणाऱ्या तरतुदी यांचे संवर्धन आणि जपवणूक करण्यासाठी जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात मुंबईमध्ये बहुजन हक्क संरक्षण महामोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आनंदराज आंबेडकर यांनी दिली. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत आनंदराज बोलत होते.

यावेळी आनंदराज यांच्यासह बहुजन समाजातील अविनाश महातेकर, अर्जुन डांगळे, चंद्रकांत हंडोरे, आमदार भाई गिरकर, नानासाहेब इंदिसे, माजी आमदार बाबुराव माने, रवी गरुड, घनश्याम चिरणकर, वाय.सी. पवार, नवी मुंबईचे उप महापौर, अविनाश लाड, रवी गरुड, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना गेले दोन महिने मुंबईत बैठका झाल्यावर संयोजन समिती स्थापन करून त्या माध्यमातून हा विराट मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. हा बहुजन मोर्चा कोणत्याही समाजाविरुद्ध नाही. महामोर्चामध्ये दलित, ओबीसी व मुस्लिम समाजाचे लोक लाखोंच्या सहभागी होतील असे अर्जुन डांगळे यांनी सांगितले.

महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये बहुजन आणि मुस्लिम समाजाचे मोर्चे निघाले आहेत या मोर्चाच्या संयोजकांशी संपर्क करण्यात आला असून त्यांनाही महामोर्चात सहभागी केले जाईल. मुंबईतील डॉक्टर, इंजिनिअर, वकील, बुद्धिजीवी, युवक युवती, वकील, प्राध्यापक, मागासवर्गीय कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी यांच्याशी तसेच महाराष्ट्राबाहेरील बहुजन मुस्लिम समाजातील लोकांशी संपर्क साधून हा विराट महामोर्चा काढला जाईल असे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी सांगितले. मुंबईतील बहुजन क्रांती महामोर्चा हा सर्व बहुजन समाजाचा असल्याने सर्व पक्षातील आमदार, माजी आमदार, लोकप्रतिनिधी एकत्र आलो असून समाजासाठी आम्हीही सर्व लोकप्रतिनिधी मोर्चात सहभागी होणार असल्याचे आमदार भाई गिरकर यांनी सांगितले.

बहुजन क्रांती महामोर्चाचे आयोजन सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी केले असले तरी या मोर्चाचे नेतृत्व सर्वसामान्य जनता, प्राधान्याने महिला व मुली करतील. मोर्चाच्या मंचावर कोणत्याही पक्षाच्या संघटनेच्या नेत्याला प्रवेश दिला जाणार नसून कोणत्याही नेत्याचे भाषण यावेळी होणार नाही. मूक मोर्चा असल्याने कुठल्याही पक्षाच्या समाजाच्या विरुद्ध घोषणा दिल्या जाणार नाहीत, मोर्चाचे निवेदन तरुण तरुणी सादर करतील, मोर्चाच्या सुरुवातीला राज्य घटनेच्या सरनाम्याचे वाचन करून राष्ट्रगीताने मोर्चाचा शेवट केला जाईल असे आयोजकांकडून सांगण्यात आले.

मोर्चातील प्रमुख मागण्या 
१ ) एट्रोसिटी कायद्यात दुरुस्ती न करता कायदा अधिक कडक करावा
२ ) मराठा समाजाला दलित, आदिवासी, ओबीसी, भटके विमुक्त यांच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावे
३ ) भटक्या विमुक्त जाती जमातीला एट्रोसिटी कायद्याअंतर्गत संरक्षण द्यावे.
४ ) दलितांवरील वाढत्या अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी शासनाने त्वरित पाऊले उचलावीत
५ ) सच्चर कमिशन रिपोर्टप्रमाणे मुस्लिमांना आरक्षण द्यावे

Post Bottom Ad