मुंबई जीपीओ चिंतामणी चषक विजेते - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 December 2016

मुंबई जीपीओ चिंतामणी चषक विजेते

मुंबई : चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ आयोजित चिंतामणी चषक प्रथम श्रेणी व्यावसायिक पुरुष गट कबड्डी स्पर्धेवर मुंबई जीपीओ कबड्डी संघाने नाव कोरले. अंतिम फेरीमध्ये पहिल्या डावात ४ गुणांनी पिछाडीवर राहूनदेखील मुंबई जीपीओ कबड्डी संघाने सेंट्रल बँकेविरुद्ध निर्णायक क्षणी ३ गुणांनी विजेतेपदाला गवसणी घातली. मुंबई जीपीओ संघातर्फे हा पराक्रम चढाईपटू जितेश सापते व रोशन परब आणि बचावपटू सिद्धेश पायनाईक व नारायण वायगणकर यांच्या अप्रतिम खेळामुळे घडला. परिणामी, सागर कुर्‍हाडे, प्रतीक शिर्के, विनायक मोटे यांनी पूर्वार्धात शर्थीने आघाडी घेऊनही अखेर सेंट्रल बँकेच्या खात्यात अंतिम उपविजेतेपदाच्या पुरस्काराचीच रक्कम जमा झाली.

मुंबई जीपीओ विरुद्ध सेंट्रल बँक मधील अंतिम सामन्याने लालबाग येथील सद्गुरू भालचंद्र महाराज क्रीडांगणामधील कबड्डी शौकिनाच्या डोळ्याचे पारणो फेडले. पहिल्या डावात सागर कुर्‍हाडे, प्रतीक शिर्के आणि बचावपटू विनायक मोटे यांचा खेळ वरचढ ठरल्यामुळे सेंट्रल बँकेने १३-९ अशी आघाडी घेत विजेतेपदाच्या आशा पल्लवीत केल्या; परंतु दुसर्‍या डावात मुंबई जीपीओ संघाने चढाईपटू जितेश सापते व रोषण परब आणि बचावपटू सिद्धेश पायनाईक व नारायण वायगणकर यांच्या खेळातून स्पीड पोस्टची झलक दर्शवली आणि मुंबई जीपीओचा विजयी पताका २४-२१ असा फडकावला.

चिंतामणी चषक पुरुष कबड्डी स्पर्धेमधील सवरेत्तम कबड्डीपटू रोशन परब ठरला. उत्कृष्ट चढाईचा पुरस्कार जितेश सापते, तर उत्कृष्ट पकडीचा पुरस्कार विनायक मोटे यांनी पटकावला. उपांत्य उपविजेतेपद बृहन्मुंबई महानगरपालिका व न्यू इंडिया अँशुरंस कबड्डी संघाने मिळवले. उपांत्यफेरीत मुंबई जीपीओ कबड्डी संघाने न्यू इंडिया अँशुरंस कबड्डी संघाचा २८-२३ असा तर सेण्ट्रल बँकेने बृहन्मुंबई महानगरपालिका संघाचा २८-२४ असा पराभव केला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नगरसेवक संजय आंबोले यांच्या उपस्थितीत पार पडला.

Post Bottom Ad