छत्रपती शिवाजी महाराज स्मारक भूमीपूजन समारंभासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - शासनाचे आवाहन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 December 2016

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक भूमीपूजन समारंभासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - शासनाचे आवाहन

मुंबई, दि. 22 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचा भूमिपूजन-जलपूजन समारंभांचा मुख्य कार्यक्रम, मेट्रो मार्ग 2, मेट्रो मार्ग 4,कुर्ला-वाकोला उन्नत मार्ग आणि मुंबई पारबंदर प्रकल्प या विविध प्रकल्पांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 24 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे होणार आहे. या समारंभास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी स्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे हे उपस्थित होते. 


छत्रपती शिवाजी महाराजांचे मुंबईमध्ये जागतिक किर्तीचे भव्य स्मारक व्हावे ही तमाम जनतेची ईच्छा होती. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक अरबी समुद्रात उभारण्याचे निश्चित केले आहे. या स्मारकाच्या उभारणीसाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या शासनाने घेतल्या असून या स्मारकाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. तसेच स्मारकाच्या कामाचे टेंडर काढण्यात आले असून भूमिपूजन समारंभानंतर लगेचच कामास सुरुवात करण्यात येणार आहे. स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम 2019 पर्यंत करण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

स्मारकाच्या भूमिपूजन-जलपूजन समारंभ कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्र सहभागी व्हावा, ही शासनाची इच्छा आहे. यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील प्रमुख गडकिल्ल्यांची माती व नद्यांचे पाणी कलशातून मुंबईत आणण्यात येणार आहे. माती व पाण्याचे कलश घेऊन राज्यातील जिल्ह्याजिल्ह्यातून नागरिक मिरवणुकीने 23 डिसेंबर रोजी सकाळी नऊपासून शिवाजी चौक, चेंबूर येथे येत आहेत. याठिकाणी शासनाच्या वतीने सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, स्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे हे त्यांचे स्वागत करणार आहेत.

या ठिकाणी भव्य रथ तयार करण्यात आला आहे. या रथावर महाराष्ट्राचा नकाशा तयार आहे. सर्व जिल्ह्यांचे कलश ठेवता येतील अशी नकाशाची रचना करण्यात आली आहे. त्यानंतर या कलशांची मिरवणूक चेंबूर- सायन-दादर टीटी-परळ-लालबाग-चिंचपोकळी-ऑर्थररोड–सातरस्ता-मुंबई सेंट्रल,गिरगांव-मेट्रो सिनेमा-छत्रपती शिवाजी टर्मिनस-महात्मा गांधी मार्ग- हुतात्मा चौक-रिगल चौक मार्गे गेटवे ऑफ इंडिया येथे येणार आहे. याठिकाणी हे सर्व कलश जिल्हानिहाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. या कलशांमधील माती व पाणी एकत्र करण्यासाठी या ठिकाणी दोन स्वतंत्र कलश ठेवण्यात आले आहेत.

स्मारकाच्या भूमिपूजन-जलपूजन समारंभाच्या दिवशी अर्थात 24 डिसेंबरला मुख्यमंत्री फडणवीस हे कलश गिरगाव चौपाटी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत. याठिकाणी भव्य समारंभ आयोजित करण्यात आला असून गिरगाव चौपाटी सजविण्यात येणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध मान्यवरांसह हावरक्राफ्टने हे कलश घेऊन अरबी समुद्रातील स्मारकाच्या नियोजित स्थळी जाऊन भूमीपूजन-जलपूजन करणार आहेत. राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, खासदार संभाजी राजे भोसले, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यावेळी उपस्थित असतील. यानिमित्त गिरगांव चौपाटी ते स्मारक स्थळ या मार्गावर शिवकालीन आरमाराचे चित्र उभे केले जाणार आहे.

यानिमित्त गिरगांव चौपाटी ते बीकेसी या मार्गावर सी-लिंक, कलानगर चौक आदी स्थळे सजविण्यात येणार आहेत, तसेच शिवराज्याभिषेक सोहळ्याप्रसंगी सादर करण्यात आलेल्या विविध कला सादर करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री तावडे यांनी यावेळी दिली. तसेच, गडकिल्ल्यांची दुरुस्ती गडकिल्ले संवर्धन समितीमार्फत करण्यात येत आहे. त्याचबरोबर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाविषयी काही सूचना असल्यास तर त्या शासनाला कळविण्याचे आवाहनही तावडे यांनी यावेळी केले. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्पाच्या ठिकाणी स्थानिक मच्छिमारांना पर्यटनाशी संबंधित व्यवसाय करण्यास प्राधान्य देणार असल्याचे मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजन-जलपूजन समारंभास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मंत्री पाटील व तावडे यांनी यावेळी केले.      


* छत्रपती शिवाजी महाराजांचे मुंबईत जागतिक किर्तीचे स्मारक व्हावे ही जनतेची इच्छा
* स्मारकासाठीच्या सर्व परवानग्या प्राप्त
* 24 डिसेंबर रोजी स्मारकाचे मा. पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजन व भूमिपूजन
* संपूर्ण महाराष्ट्र या कार्यक्रमात सहभागी व्हावा यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील प्रमुख नद्यांचे पाणी व गड
* किल्ल्यांची माती कलशातून आणण्यात येणार
* सर्व जिल्ह्यांचे कलश शिवाजी चौक, चेंबूर येथे जमा करण्यात येणार
* कलश ठेवण्यासाठी भव्य रथ  
* कलशांची मिरवणूक चेंबूर ते गेट वेपर्यंत काढण्यात येणार
* गेट वे ऑफ इंडिया येथे सर्व कलश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करणार
* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कलश गिरगाव चौपाटी येथे मा. पंतप्रधानांच्या स्वाधीन करणार
* मान्यवरांच्या हस्ते कलशातील माती व पाणी नियोजित स्मारकाच्या ठिकाणी टाकून भूमीपूजन व जलपूजन  करणार
 * बीकेसी येथे जाहीर सभा व विविध उपक्रमांचे भूमीपूजन

Post Bottom Ad