महापालिका शाळांचा दर्जा सुधारत आहे - महापौर स्नेहल आंबेकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 December 2016

महापालिका शाळांचा दर्जा सुधारत आहे - महापौर स्नेहल आंबेकर

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका विद्यार्थ्यांना सेवा-सुविधा पुरवित असतानाच विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षणही पुरवित आहे. महापालिका शाळांचा निकाल पाहता भविष्यात पालक महापालिका शाळेत प्रवेश घेण्यासाठी पुढाकार घेतील,असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी केले.
बृहन्मुंबई महानगरपालिका विद्यार्थ्यांना पुरवित असलेले तंत्रज्ञान आणि ज्ञान याचा विचार करता महापालिका शाळेतील विद्यार्थी महापालिकेचे नांव जगभर पसरवतील, असे प्रतिपादन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ‘एफ/उत्तर’ विभागातील ‘हाजी इस्माईल हाजी अल्लाना महानगरपालिका शाळा’ नवीन इमारतीचे लोकार्पण व ‘प्रतीक्षा नगर महानगरपालिका शाळा’ चे लोकार्पण मुंबईच्या महापौर श्रीमती स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते व युवा सेना प्रमुख श्री. आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दिनांक २३ डिसेंबर, २०१६) संपन्न झाले. ‘हाजी इस्माईल हाजी अल्लाना महानगरपालिका शाळा’ नवीन इमारतीचे लोकार्पण सकाळी हाजी इस्माईल हाजी अल्लाना महानगरपालिका शाळा,शेख मिस्त्री दर्गाजवळ, शेख मिस्त्री दर्गा मार्ग, ऍण्टॉप हिल, वडाळा (पूर्व) येथे सभागृह नेता श्रीमती तृष्णा विश्वासराव यांच्या अध्यक्षतेखाली, तर ‘प्रतीक्षा नगर महानगरपालिका शाळा’ चे लोकार्पण प्रतीक्षा नगर महानगरपालिका शाळा, सुंदरविहार बस थांब्यासमोर,प्रतीक्षा नगर, शीव (पूर्व) येथे स्थानिक नगरसेविका श्रीमती प्रणिता वाघधरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

या कार्यक्रमास मुंबईच्या उप महापौर अलका केरकर, शिक्षण समितीच्या अध्यक्षा हेमांगी वरळीकर, ‘एफ/दक्षिण व एफ/उत्तर’ प्रभाग समितीच्या अध्यक्षा हेमांगी चेंबूरकर, नगरसेविका तथा माजी महापौर श्रद्धा जाधव, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे, उप आयुक्त (शिक्षण) मिलीन सावंत, उप आयुक्त (अभियांत्रिकी) प्रकाश पवार, शिक्षणाधिकारी महेश पालकर तसेच शिक्षण विभागातील अधिकारी व स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

महापौर स्नेहल आंबेकर पुढे बोलताना म्हणाल्या की, महापालिकेचा विद्यार्थी ज्ञानी, हुशार सोबतच जबाबदार भारतीय नागरिकसुद्धा झाला पाहिजे. बृहन्मुंबई महानगरपालिका शाळेचा दर्जा व गुणवत्तेत सुधारणा होत असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड त्याला देण्यात आली आहे. खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना ज्या सेवा-सुविधा पुरविल्या जात नाहीत, त्या सेवा-सुविधा, तंत्रज्ञान बृहन्मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना देण्यात येते. तसेच बहुभाषिक शिक्षण महापालिकेच्या शाळेतून विद्यार्थ्यांना देण्यात येते. विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळावा, म्हणून व्यवसायिक अभ्यासक्रमही विद्यार्थ्यांना दिले जात असल्याचे महापौर स्नेहल आंबेकर यांनी सांगितले.

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले की, काही दिवसांपूर्वी एका संस्थेने महापालिका शाळांच्या केलेल्या सर्वेक्षणात महापालिका पुरवित असलेल्या सेवा-सुविधांबाबत कौतुक केले आहे, यावरुन महापालिका शाळा उत्तम असल्याची पावती मिळते. महापालिका अनेक उपक्रम, प्रकल्प आणि योजना राबवित असल्याने विविध कार्यक्रमांचे उद्घाटन, लोकार्पण, भूमिपूजन मोठय़ा प्रमाणात होत आहे.

बृहन्मुंबई महापालिका शाळा या महत्त्वाच्या असून त्यांचे नूतनीकरण,भूमिपूजन, नवीन इमारतीचे लोकार्पण मोठय़ा प्रमाणात होत आहे. महापालिका शाळांत ३-४ वर्षांपूर्वी व्हर्च्युअल क्लासरुमची संकल्पना पहिल्यांदा राबविली असून त्याचा फायदा ४८० शाळेतील विद्यार्थ्यांना होत आहे. सद्या ‘डिजिटल प्रणाली’ विकसित होत असून या प्रणालीचाही उपयोग करण्यात यावा, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले. महापालिकेचे विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात कमी पडू नये यासाठी सांगोपांग शिक्षण दिले जात आहे. परकीय भाषेतील शिक्षणही महापालिका शाळांमधून दिले जावे, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.

अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे यांनी सांगितले की, बृहन्मुंबई महानगरपालिका ही अशी महापालिका आहे की, विद्यार्थ्यांना उत्तम सेवा-सुविधा पुरवित आहे. सुमारे १२०० महापालिका शाळांतून ३ लाख ५० हजार विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावे,याकरीता प्रयत्नही केले जात आहे. विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान, ग्रंथालय, वाचन संस्कृती वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यावर्षी विद्यार्थ्यांना २७ शालोपयोगी वस्तू वेळेत पोहोचविण्याचे काम प्रशासनाने योग्यरितीने पार पाडल्याचे डॉ.पल्लवी दराडे यांनी नमूद केले. याकरीता पालिकेतील सर्व पदाधिकारी यांचे सहकार्य लाभल्याचेही त्यांनी सांगितले.

Post Bottom Ad