मुंबई / प्रतिनिधी
मुंबई महापालिकेची निवडणुक होणार हे माहीत असले तरी अद्याप निवडणुकीची तारीख जाहिर करण्यात आलेली नाही. त्यातच पालिकेचा सर्व्हर डाउन असल्याने नगरसेवकांची कामे होत नसल्याने आम्ही निवडणुकीदरम्यान लोकांना काय तोंड दाखवू अशी खंत नगरसेवकांनी सभागृहात व्यक्त केली.
समाजवादी पक्षाचे नगरसेवक याकूब मेनन यांनी निवडणुकीची कारणे देवून वार्डमधील अधिकारी कामे करत नसल्याची तक्रार हरकतीच्या मुद्द्याद्वारे केली. निवडणुकीची तारीख जाहिर झाली आहे का ? सभागृह 7 मार्चला बरखास्त होणार आहे म्हणून 100 दिवस आधी 7 डिसेंबरपासून निधी खर्च करण्यास बंदी घातली आहे. तर याच पालिकेच्या चिटणीस विभागाने 20 डिसेंबर पर्यंत नगरसेवकांनी सिमकार्ड परत करावेत असे पत्र पाठवले आहे. पालिकेत असा दुजाभाव का ? दोन वेगवेगळे नियम का असा प्रश्न मेनन यांनी उपस्थित केला.
जी कामे मंजूर झाली आहेत इ टेंडरिंग झाली आहे अश्या कामाचेही वर्क ऑर्डर निघत नाही. जी कामे 50 -51 टक्के बिलों रेट आहे अशी कारणे देवून 4-5 महीने वेळ वाया घालवून पुन्हा 49 टक्के बिलों रेट टेंडर मंजूर करून प्रशासन वेळ काढू पणा करत नाही का ? असा प्रश्न मेनन यांनी उपस्थित केला. भांडुपच्या एस वार्ड मध्ये तर निधि वापरू नए याबाबतचे पालिका आयुक्तांचे 26 नोव्हेंबरचे पत्र 3 डिसेंबरला पोहचले यानंतर पालिकेचा सर्व्हर डाउन झाल्याने नगरसेवकांच्या कामाच्या वर्क ऑर्डर निघालेल्या नाहित असे मनसेच्या अनिषा माझगावकर यांनी सांगितले.
यावर कोणतेही कामे बंद करू नका असे आदेश दिलेले नाहित, निवडणूक आयोगाने जे आदेश दिले त्या प्रमाणे निवडणूकीच्या आधी 100 दिवस निधी देण्याचे बंद केले आहे. याची माहिती गटनेत्यांच्या बैठकीत देण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी सांगितले. यावर गट नेत्यांच्या बैठकीत सर्व्हर डाउन असल्याने निवडणुक आयोगाशी चर्चा करून 8-10 दिवसाची मुदत वाढ मागावी असे ठरले होते. याबाबत आयुक्तांनी काय कारवाई केली याची माहिती द्यावी अशी मागणी संदिप देशपांडे, धनंजय पिसाळ यांनी केली. यावर 22 डिसेंबरला सभागृहात याची सविस्तर माहिती सादर करावी असे निर्देश महापौर स्नेहल आंबेकर यांनी दिले.