मुंबई - मुंबई पोलीस दलाला सुसज्ज, अत्याधुनिक करण्यासाठी आणि मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी नव्या तंत्रज्ञानाने सज्ज अशा मॉडिफाय बुलेट मुंबई पोलीस दलात बुधवारी दाखल झाल्या. पोलीस दलाला 236 बुलेट मोटारसायकल देण्याचा प्रस्ताव असून त्यापैकी 28 बुलेट मुंबईच्या रस्त्यावर उतरल्या आहेत असे पोलीस प्रवक्ते पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी सांगितले.
एखादी घटना घडल्यास सायरन वाजवत मदतीसाठी धावणार्या पोलिसांच्या गाड्या आपण नेहमीच पाहिल्या आहेत. पोलिसांच्या या गाड्यांप्रमाणेच आता नव्याने पोलीस दलात दाखल झालेल्या बुलेटवर बसविण्यात आलेले सायरन आता मुंबईकरांना ऐकायला आणि पाहायला मिळणार आहेत. या गाड्यांवर माईक सिस्टम, वॉकीटॉकी, प्राथमिक उपचाराची आषधे, फ्लॅशर लाईट अशा विशेष सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील वाहनांच्या गर्दीतून वाट काढत घटनास्थळावर लवकरात लवकर पोहचणे पोलिसांना शक्य होणार आहे. मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्याला दोन बीट मार्शल बुलेट देण्यात येणार असून या उपक्रमासाठी स्वतंत्र पोलिसांची नेमणूक करण्यात येणार आहे. हा प्रकल्प प्राथमिक टप्प्यात असून येत्या काही दिवसांत सर्व गाड्या पोलीस दलात दाखल होतील असे पोलीस प्रवक्ते पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी सांगितले.