नागपूर, दि. 7 : महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपूर येथे होत असते. हे औचित्य साधून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रसिद्ध होणाऱ्या ‘लोकराज्य’ या मराठी व ‘महाराष्ट्र अहेड’ या इंग्रजी मासिकाचा डिसेंबर, 2016 चा अंक ‘नागपूर अधिवेशन विशेषांक’ म्हणून तयार करण्यात आला. या विशेषांकांचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथील विधानभवनातील विधानपरिषद सभागृहात करण्यात आले. या अंकांत नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचा इतिहास आणि परंपरांची इत्यंभूत माहिती देण्यात आली असल्याने अंक वाचनीय व संग्राह्य झाला आहे.
राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या संसदीय अभ्यासवर्गाच्या उद्घाटन समारोहात झालेल्या या प्रकाशन समारंभास विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, शिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री विनोद तावडे, आमदार ॲड. आशिष शेलार, विधानमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, ‘लोकराज्य’च्या संपादक मंडळाचे सदस्य तथा संचालक (माहिती) (वृत्त) देवेंद्र भुजबळ, संचालक (माध्यम समन्वय) शिवाजी मानकर, नागपूर विभागाचे संचालक (माहिती) राधाकृष्ण मुळी आणि विधान मंडळाचे वरिष्ठ अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
या विशेषांकात विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नागपूर अधिवेशनाविषयीच्या आपल्या आठवणी जागविण्याबरोबरच अनेक महत्वपूर्ण अनुभवांचे विवेचन केले आहे.
‘लोकराज्य’चे मुख्य संपादक ब्रिजेश सिंह यांनी आपल्या संपादकीयमधून नागपूर अधिवेशनाच्या वेगळेपणाचे महत्व विशद केले आहे. नागपुरात झालेले विधानमंडळाचे पहिले अधिवेशन, नागपूर करार, महाराष्ट्राला विदर्भातून लाभलेले नेतृत्व, विधानभवनातील महत्वाच्या घटना, राज्यशास्त्र आणि लोकप्रशासनच्या विद्यार्थ्यांसाठी हिवाळी अधिवेशन कालावधीत 1964 पासून चालविला जाणारा संसदीय अभ्यासवर्ग यासह या अधिवेशन कालावधीतील अनेक महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक घटनांचा आढावा या विशेषांकात घेण्यात आला आहे.
आमदार सर्वश्री हेमंत टकले, डॉ. नीलम गोऱ्हे, डॉ. अशोक उईके, प्रशांत ठाकूर, डॉ. संजय कुटे, बळीराम सिरस्कार, डॉ. मिलिंद माने, शिवाजीराव नाईक, ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, संजय शिरसाट, हर्षवर्धन सपकाळ, माजी आमदार उल्हासदादा पवार यांनीही हिवाळी अधिवेशन काळातील अनेक आठवणी या विशेषांकांत जागविल्या आहेत.
अधिवेशन काळातील नागपुरातील थंडीचा कडाका, येथील पाहुणचार, काव्यमैफल, विविध विषयांवरील वादळी चर्चा, उत्साही वातावरण, राज्यातील आणि विशेषकरुन विदर्भातील विविध प्रश्नांच्या निराकरणासाठी आमदारांकडून केला जाणारा पाठपुरावा, अधिकाऱ्यांची उत्तम कामे, राजकीय परिस्थितीची वळणे, आवडते शहर आणि आवडता मीडिया अशा विविध अंगांनी विधानमंडळ सदस्यांनी आपले अनुभव या विशेषांकांत मांडले आहेत.
याशिवाय विदर्भातील नागरिकांना हिवाळी अधिवेशनाकडून असलेल्या अपेक्षांनाही या विशेषांकात स्थान देण्यात आले आहे. इतिहासाचा साक्षीदार असलेल्या नागपुरातील राजभवनाची माहितीही या विशेषांकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. संसदीय कामकाज कसे चालते, विधानसभा आणि विधानपरिषद कशी असते याची माहितीही विशेषांकांत असून राज्यातील सर्व आमदारांची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लेख तसेच केंद्र शासनाने काळा पैसा रोखण्यासाठी घेतलेल्या निश्चलनीकरणासंदर्भातील माहिती देणाऱ्या लेखाचाही या विशेषांकांत समावेश आहे.