चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसराची साफसफाई पूर्ण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 December 2016

चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसराची साफसफाई पूर्ण

महापौरांचा स्वच्छता अभियानात सहभाग
मुंबई / प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी चैत्यभूमीस भेट देत असतात. त्यांना दर्जेदार उत्कृष्ट नागरी सेवा-सुविधा बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाकडून देण्यात येतात. यावर्षीही बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने दिनांक ४ ते ७ डिसेंबर, २०१६ या कालावधीत विशेष मोहिमेद्वारे चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसराची संपूर्ण स्वच्छता आणि कचरा संकलित करुन त्याचे व्यवस्थापन केले. महापौर स्नेहल आंबेकर यांनी आज (दिनांक ७ डिसेंबर, २०१६) सकाळी या स्वच्छता अभियानात सहभाग नोंदविला.

दिनांक ६ डिसेंबर, २०१६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशातील विविध राज्यांतून येणाऱया लाखो अनुयायांसाठी चैत्यभूमी, शिवाजी पार्क परिसरात बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ठिकठिकाणी उपलब्ध करुन दिलेली स्नानगृहे, फिरती शौचालये, पिण्याच्या पाण्याची तसेच शिवाजी पार्क मैदानात राहण्याची तात्पुरती व्यवस्था, एकंदरीत स्वच्छता आदी नागरी सेवा-सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त (परिमंडळ -२) आनंद वागराळकर, ‘जी/उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादार यांच्या निर्देशानुसार घन कचरा व्यवस्थापन खात्यातील अधिकारी तसेच अशासकीय संस्थेच्या सदस्यांनी संपूर्ण परिसराची साफसफाई करुन हा परिसर स्वच्छ केला आहे.

राम गणेश गडकरी चौक, सेनाभवन, दादर रेल्वे स्थानक, केळुस्कर मार्ग (दक्षिण व उत्तर विभाग), गोखले मार्ग, एस. के. बोले मार्ग, टिळक पूल, रानडे मार्ग आदी ठिकाणी परिरक्षण खात्याच्या कर्मचाऱयांनी अनुज्ञापन खात्याच्या सहकार्याने महापालिका अभियंत्यांच्या उपस्थितीत पोस्टर्स, बॅनर्स काढण्याची कारवाई पूर्ण केली आहे. दिनांक ६ डिसेंबर, २०१६ च्या मध्यरात्रीपासून साफसफाईच्या विशेष मोहिमेचे नियोजनपूर्वक आयोजन केले होते.

मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी आज (दिनांक ७ डिसेंबर, २०१६) सकाळी स्वतः उपस्थित राहून या साफसफाई मोहिमेत सहभाग घेतला व संबंधीतांना योग्य ते निर्देश दिले. यावेळी ‘जी/उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादार व संबंधित अधिकारी उपस्थित होते. यामध्ये रस्ता व पदपथ स्वच्छ करुन धुण्यात आले. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱयांनीही या मोहिमेत सहभाग घेतला. शिवाजी पार्क मैदानातील अंतर्गत हिरवळ तसेच खेळाची मैदाने पूर्वस्थितीत करुन नागरिकांना तसेच मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागरी सेवा-सुविधा तसेच वाहतूक व्यवस्था चोख ठेवल्याबद्दल गत चार दिवस अहोरात्र मेहनत घेतलेल्या लोकप्रतिनिधी, पोलिस दल, राज्य राखीव पोलिस दल, वाहतूक पोलिस, अशासकीय संस्था, प्राधिकरण, विविध सामाजिक संस्था, पदाधिकारी व सर्व संबंधीतांचे महापौर स्नेहल आंबेकर व महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आभार मानले आहेत

Post Bottom Ad