सर्वसामान्यांना होत असलेल्या त्रासावर सभागृहात चर्चा गरजेची - आ.अबु आझमी
नागपूर : ७ डिसेंबरपंतप्रधानांनी महिन्याभरापुर्वी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे राज्यभरातील सर्वसामान्यांना होत असलेल्या त्रासाबाबत विधानसभेत चर्चा करण्याची मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. आ. अबु असीम आझमी यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली. या निर्णयामुळे राज्याची एकूणच अर्थव्यवस्था धोक्यात आली असून या सर्व बाबींचा सभागृहात उहापोह होणे गरजेचे असून सर्वसामान्यांचा त्रास कमी करण्यासाठी राज्य सरकारने काही त्वरीत उपाययोजना करण्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी या स्थगन प्रस्तावाद्वारे त्यांनी केली.
बुधवारी सकाळी नोटबंदीच्या मुद्द्यावर विधानसभा अधिनियम ९७ अंतर्गत स्थगन प्रस्ताव दाखल करून घेण्याची विनंती मा. आझमी यांनी विधानसभा अध्यक्षांना केली होती. नाेटबंदीच्या निर्णयामुळे देशभरात मोठ्या प्रमाणावर चलन तुटवडा निर्माण झाला आहे. या चलन तुटवड्यामुळे राज्यातही सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या हालअपेष्टांना तोंड द्यावे लागत आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर आज एक महिना उलटून गेला तरीही बँक आणि एटीएमसमोर पैशासाठी लोकांच्या मोठमोठ्या रांगा कायम आहेत. या रांगांमध्ये उभे राहण्याचा त्रास सहन न झाल्याने देशभरात अनेकांचा मृत्यु देखील झाल्याचे मा. आझमी यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले.विशेषत: या निर्णयामुळे हातावर पोट असलेल्या गरीब आणि कामगार वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागातही जिल्हा सहकारी बँकांवर लादलेल्या व्यवहारबंदीमुळे शेतकऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हाती पैसा नसल्याने रब्बी हंगामाच्या पेरण्या रखडल्या असून बँकेतून पैसे काढण्यावर मर्यादा असल्याने नियोजित विवाह समारंभही पुढे ढकलावे लागत असल्याकडेही त्यांनी अध्यक्षांचे लक्ष वेधले आणि चर्चेची मागणी केली. तसेच या अडचणींतून सर्वसामान्यांची सुटका करण्यासाठी त्वरीत उपाययोजना करण्याचे शासनाला निर्देश द्यावेत अशीही विनंती त्यांनी विधानसभा अध्यक्षांना केली.