शिवस्मारकाचे भूमिपूजन हे फक्त आगामी निवडणुकांसाठी पोकळ आश्वासन असू नये – संजय निरुपम.. - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 December 2016

शिवस्मारकाचे भूमिपूजन हे फक्त आगामी निवडणुकांसाठी पोकळ आश्वासन असू नये – संजय निरुपम..

मुंबई / प्रतिनिधी -
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रस्तावित अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या स्मारकाचे भूमिपूजन करायला येणार आहेत. शिवस्मारक हे व्हायलाच हवे, भव्य व्हायलाच हवे त्याबद्दल आमचे दुमत नाही. पण हे भूमिपूजन फक्त आगामी महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेले नसावे आणि या स्मारकाच्या नावावर कोणतीही राजनीती करू नये असे असे आवाहन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले. 

या आधीही विद्यमान भाजपा सरकारने जेव्हा बिहारमध्ये निवडणुका सुरु होणार होत्या तेव्हा कोणतीही टेंडरिंग किंवा फंडिंग नसताना सुद्धा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदु मिल येथे स्मारकाचे भूमिपूजन नोव्हेंबर २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. पण अजून त्या स्मारकाचे कोणतेही बांधकाम सुरु झालेले नाही. अजून त्या जमिनीचे हस्तांतरण सुद्धा झालेले नाही. अशाच प्रकारे जेव्हा २०१२ मध्ये गुजरातमध्ये निवडणुका झाल्या. त्यावेळी गुजरातमध्ये भाजपाने सरदार पटेल यांची भव्य प्रतिमा बनवण्याचे आश्वासन दिले. पण त्याचे काय झाले? फक्त निवडणुका आल्या की भाजपाचे नेते अशी आश्वासने देतात. आता उद्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाबद्दल बोलायचे झाले. तर उद्याच्या कार्यक्रमाचा अवाढव्य खर्च. १८ करोड रुपये भूमिपूजनाचा खर्च, MMRDA ग्राउंड चा खर्च २४ करोड रुपये, ८० हजारांच्या आसपास खुर्च्या, येत्या २-३ दिवसात वर्तमानपत्रांमध्ये ज्या जाहिरातबाजी होईल त्याचा खर्च १५ करोड, होर्डींग्स वर २० करोड रुपये खर्च, या सर्व खर्चाची बेरीज केली तर जवळपास ७७ करोड रुपये खर्च होतो. ज्या महाराष्ट्रावर ३.३३ लाख करोड रुपयांचे कर्ज आहे, ज्या महाराष्ट्रातील जनता नोटबंदीच्या समस्येने त्रस्त झालेली आहे. देशामध्ये रोख नोटांची टंचाई असताना अशा वेळेला असा वायफळ खर्च करणे योग्य आहे का? हे पैसे कोणाच्या खात्यातून जाणार आहेत? हे सर्व ७७ करोड रुपये सर्व सामान्य जनतेचे (करदाते) आहेत.

उद्या सहा प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. या प्रकल्पांचा अपेक्षित खर्च ४२ हजार करोड रुपये आहे. यातील काही प्रोजेक्ट असे आहेत. ज्यांना अजून आवश्यक परवानगी मिळालेली नाही आणि काही प्रोजेक्ट असे आहेत, ज्यासाठी पर्याप्त निधीच उपलब्ध नाही. डी.एन. नगर-मानखुर्द मेट्रो २-ब. २३.५ कि.मी. लांबी, वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो ४. ३२ कि.मी. लांबी, शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक २२ कि.मी., कलानगर, वांद्रे पूर्व येथे सी-लिंकच्या देशेने ये-जा करण्यासाठी उड्डाणपूल आणि कुर्ला वाकोला ५ कि.मी. चा एलिवेटेड रस्ता असे प्रस्तावित प्रकल्प आहेत. मेट्रो लाईन २-ब चा अपेक्षित खर्च १०,९७० करोड रुपये आहे, मेट्रो लाईन ४ चा अपेक्षित खर्च १४,५५० करोड रुपये आहे पण त्यात अजून एक पैशाची सुद्धा तरतूद झालेली नाही. उर्वरित प्रोजेक्टसाठी सुद्धा सरकारकडून कोणत्याही तरतूद करण्यात आलेली नाही. मागील वर्षी सुद्धा मेट्रो २ चे भूमिपूजन केले होते. त्याचा प्रस्तावित खर्च ६३०० करोड आहे. पण त्यासाठी अजून कोणतेही फंडिंग आलेले नाही. कामाची काही सुरुवात झालेली नाही. आमची हीच मागणी आहे की सरकारने हे प्रकल्प पूर्णत्वास न्यावेत. ही फक्त पोकळ आश्वासने असू नयेत. असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले.

सदर प्रसंगी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या समवेत आमदार नितेश राणे, माजी आमदार चरणसिंग सप्रा, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे आणि मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील उपस्थित होते.

Post Bottom Ad