मुंबई - बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील पूर्व द्रुतगती महामार्ग व पश्चिम द्रुतगती महामार्गावर पुरेशा प्रमाणात सार्वजनिक शौचालये नसल्याने या महामार्गांवरुन प्रवास करणा-या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असे. ही बाब लक्षात घेऊन बृहन्मुंबई महापालिकेने पूर्व द्रुतगती महामार्गावर ७ तर पश्चिम द्रुतगती महामार्गावर ६ शौचालये उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आता पश्चिम द्रुतगती महामार्गावरील ६ पैकी ५ शौचालये सुरु झाली आहेत. तर पूर्व द्रुतगती महामार्गावरील सातही शौचालयांच्या बांधकाम कार्यवाहीने आता वेग घेतला आहे. विशेष म्हणजे ही शौचालये महामार्गांच्या दोन्ही बाजूंना असणार आहेत, ज्यामुळे मुंबई कडून मुलुंड वा दहिसरकडे जाणा-या व येणा-यांना याचा फायदा होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित असणा-या पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गांच्या जवळ महापालिकेद्वारे नव्याने बांधण्यात आलेल्या / बांधण्यात येणा-या या सशुल्क शौचालयांमध्ये स्त्रियांसाठी व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था असणार आहे. तसेच दिव्यांग व्यक्तींच्या वैशिष्ट्यपूर्ण गरजा लक्षात घेऊन या शौचालयांचे बांधकाम असणार आहे. विशेष म्हणजे या सर्व शौचालयांच्या आधी किमान १ किलोमीटर अंतरावर शौचालयाच्या उपलब्धतेविषयी माहिती फलक लावण्यात येत आहेत. जेणेकरुन वाहनचालकांना शौचालय कुठे व किती अंतरावर आहे याची पूर्वसूचना मिळू शकणार आहे.