मुंबई 1 Dec 2016 : जातपडताळणी प्रक्रिया अधिक सुलभ, सुटसुटीत आणि गतीमान करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. सह्याद्री अथितीगृहात सामाजिक न्याय विभागाच्या पथदर्शी योजनाचा आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलिप कांबळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जात पडताळणी ही प्रक्रिया पूर्ण करताना सामान्य नागरिकांना अधिक काळ ताटकळत रहावे लागणार नाही, त्यांची कुठेही अडवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. पडताळणीचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत ३ महिन्याच्या वर जाता कामा नये, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
रमाई आवास योजनेतंर्गत मार्च २०१७ अखेर १ लाख घरांच्या निर्मितीचे लक्ष पूर्ण करण्यात यावे, असे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले. दिव्यांग व्यक्तिसाठी महसूल विभागात एका ठिकाणी अद्ययावत भवन उभारणे, दिव्यांग व्यक्तींसाठीचे धोरण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रोत्साहन योजनेंतर्गत उद्योजक तयार करणे, सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची स्टार्ट अप योजनेशी सांगड घालणे, योजनांच्या प्रचार प्रसारासाठी माध्यमांचा वापर, भरती प्रक्रिया पारदर्शक, विकलांग व्यक्तींसाठी नवे धोरण यासह विभागाच्या अन्य योजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला.