मुंबईवर निळा झेंडा फडकवूया - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 December 2016

मुंबईवर निळा झेंडा फडकवूया

11 Dec 2016
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित रिपब्लिकन पक्ष स्थापन झाला. रिपब्लिकन पक्षाच्या पाठीशी बाबासाहेबांचे मौलिक विचार असताना पक्ष चालवणाऱ्या नेत्यांमुळे पक्षाची वाताहत झाली आहे. रिपब्लिकन पक्षाचे विविध नावाने अनेक गट कार्यरत आहेत. प्रत्येकाला नेते बनण्याची हौस असल्याने रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट निर्माण झाले. रिपब्लिकन पक्ष निवडणुकांमध्ये मते मिळवण्यात अपयशी ठरत असला तरी गट निर्माण करणारे नेते मात्र निवडणुकीमध्ये अनेक मार्गाने मालामाल होऊ लागले आहेत.
रिपब्लिकन नावाने आपला गट निर्माण केल्यानंतर निवडणूकीदरम्यान आपल्याला सोयीच्या आणि आपली आर्थिक मागणी पूर्ण करणाऱ्या पक्षाला पाठींबा देण्याचे राजकारण सुरु झाले. इतर प्रस्थापित पक्षाला पाठींबा दिल्यावर बौद्धांची मते मिळतील या अपेक्षेने गटातटातील नेत्यांना पैसे देण्याबरोबरच निवडणूक लढवण्यास काही जागाही दिल्या जातात. या जागेवर रिपब्लिकन पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा असताना या मिळालेल्या जागांवर पक्षाला आर्थिक मदत करतील अश्या लोकांना उमेदवारी दिली जाते. यामुळे अश्या उमेदवारांना लोक ओळखतच नसल्याने लोकांची मते मिळत नाहीत.

असे प्रकार सर्रास सुरु आहेत. यामुळे बाबासाहेबांचे नाव घेणाऱ्या गटाततटात विभागलेल्या रिपब्लिकन पक्षाला आपले स्वतःचे उमेदवार निवडून आणण्यात अपयश येत आहे. आपले स्वतःचे उमेदवार निवडून आणण्यात अपयशी ठरलेल्या रिपब्लिकन पक्षातील गटातटांनी प्रस्थापित पक्षांपुढे सतत उमेदवारी आणि पैशांची भीक मागितल्याने आज लोकांच्या मनातून साफ उतरून गेले आहेत. काहींनी तर बाबासाहेबांच्या विचाराला तिलांजली देऊन विरोधी विचारधारेच्या पक्षाशी युती करून सत्तेतील पद मिळवले आहे. यामुळे समाज आणखी नाराज झाला आहे.

समाजामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या नावाने चालवणाऱ्या विविध गटांविरोधात कमालीची नाराजी आहे. नेत्यांनी समाजाला नेहमीच गृहीत धरले होते. नेते आपली मनमानी करत असल्याने नाराज समाजाने विविध निवडणुकांमध्ये रिपब्लिकन नेत्यांना, गटांना नाकारले आहे हे यांना मिळालेल्या मतांवरून सिद्ध होते. गटांतटांच्या राजकारणाला वैतागून अनेकांनी आपली मते फुकट का घालवायची म्हणून इतर प्रस्तापित पक्षाला आपली मते दिली आहेत. तर काहीं लोक इतर प्रस्तापित पक्षाकडून पैसे, भांडी, कपडे इत्यादी वस्तू मिळत असल्याने आपली मते अश्या पक्षाला देत आहेत. यामुळे समाजातील मतांची मोठ्या प्रमाणात विभागणी होत आहे. समाजाची मते आपल्या वागणुकीमुळे आपल्याला मिळत नाहीत याचा विचार करण्यासही नेत्यांना वेळ नाही हि शोकांतिकाच म्हणावी लागेल.

समाजातील मतांची विभागणी होत असताना आणि समाजामध्ये नेत्यांच्या बद्दल कमालीची नाराजी असताना बौद्ध आणि बहुजन समाजातील अनेक लोकांवर अन्याय अत्याचार होत आहेत. या अन्याय अत्याचाराच्या प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. यामध्येही राजकारण म्हणून रिपब्लिकन नावाने चालणाऱ्या गटांनी निदर्शने, मोर्चे काढले तेही आपला पक्ष, गट जिवंत आहे हे दाखवण्यासाठीच. परंतू कोपर्डीचे प्रकरण घडल्यानंतर बौद्ध आणू बहुजन समाजातील लोकांच्या विरोधात वातावरण तापले एट्रोसिटी कायदा रद्द करावा, या कायद्यामध्ये बदल करावा म्हणून लाखोंचे मोर्चे काढले गेले. मराठा समाज लाखोंचे मोर्चे काढून बौद्ध आणि बहुजन समाजाला कवच असलेला एट्रोसिटी कायदा बदला अशी मागणी करू लागल्याने बौद्ध, बहुजन समाज जागरूक झाला आहे.

मराठा समाजाचे लोक मोर्चे काढून एट्रोसिटी कायदा बदला अशी मागणी करत असताना रिपब्लिकन गटातील नेते फक्त मिडियामध्ये आपल्या त्यावर प्रतिक्रिया देत राहिले. प्रत्यक्ष कृती मात्र केली नाही. मराठा समाजाकडून जी मागणी केली जात होती यामुळे बौद्ध, बहुजन समाजामध्ये असुरक्षिततेची भावना आणि भिती निर्माण झाली होती. हि असुरक्षिततेची भावना आणि भिती कमी करण्यास गटातटातील नेते कमी पडले. परंतू या नंतर बौद्ध, बहुजन समाज एकत्र आला त्याला मुस्लिम समाजाची साथ मिळाली आणि राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये बौद्ध, बहुजन, मुस्लिम समाजाचे लाखोंचे मोर्चे निघू लागले. नेत्यांची तोंडे दहा दिशेला असताना समाज एकत्र आला. समाज फक्त मोर्चासाठी एकत्र आला नाही तर याचे एकीचे बळ नगरपालिका, नगर परिषदांच्या निवडणुकीमध्ये दिसले.

नगरपालिका नगरपरिषदा निवडणुकीमध्ये कारंजा ( वाशिम ), मंगळुरपीर, बुलढाणा या तीन ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. यावेळी नगराध्यक्ष थेट मतदारांकडून निवडणुन गेल्याने भारिप बहुजन महासंघाचे नुसते ३ नगराध्यक्ष निवडून आलेले नाहीत तर कारंजा ( वाशिम ) - 18, बुलढाणा - 2, खामगाव - 1, जळगाव जामोद - 1, शेगाव - 1, तेल्हारा - 1, मुर्तिजापुर - 4, अकोट - 3 असे नगरसेवकही निवडून आले आहेत. सुरेश माने यांच्या बहुजन सोशालिस्ट रिपब्लिकन पार्टीचे ३ नगरसेवक निवडून आले आहेत. कांशीराम व मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाचेही ३ नगरसेवक निवडून आले आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपाच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसलेल्या रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा फायदा उचलता आलेला नाही. सत्तेत असलेल्या आठवले यांना फक्त ३ नगरसेवक निवडून आणता आलेले आहेत.

बौद्ध, बहुजन, मुस्लिम समाज एकत्र आल्याने मतांचे नवे समीकरण सुरु झाले आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बहुजन समाजाचे नवे समीकरण यशस्वी होऊ लागले आहे. बहुजन समाजातील लोकांना आपले हक्काचे लोकप्रतिनिधी हे आपले स्वतःचे लोकच होऊ शकतात हे पटले आहे. यामुळे महाराष्ट्रात ठीक ठकाणी निघालेल्या मोर्चे आयोजित करणाऱ्यांना धन्यवाद द्यावे लागतील. नाशिक मधील प्रकार वगळता अनेक ठिकाणी मोर्चे यशस्वी झाल्याने मुंबईमध्येही मोर्चा काढण्यात येत आहे. हा मोर्चा काढण्या आधीच तीन गट पडले आहेत. राजकारणापासून अलिप्त असलेल्या तरुणांचा एक गट, श्यामदादा गायकवाड यांचा एक गट २४ डिसेंबरला मुंबईत मोर्चा काढत आहे. तर सर्व वाद बाजूला ठेवून सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मोर्चा काढण्याचे निश्चित केले आहे.

महाराष्ट्रात सर्वत्र एकत्र आलेल्या बहुजन, मुस्लिम समाजाचे उदाहरण असताना मुंबईमध्ये मात्र तीन तेरा वाजवले जात आहेत. भारताची आर्थिक राजधानी आणि जागतिक दर्जाचे शहर मुंबई असल्याने मुंबईतला मोर्चा हा तश्याच तोडीचा हवा. मराठा समाजाचा नागपूर अधिवेशनावर १४ डिसेंबरला मोर्चा आहे. राज्य सरकारने व मुख्यमंत्र्यांनी नुकतेच मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही हे विधानसभेत सांगितले आहे. यामुळे मराठा समाज ९ जानेवारीला मुंबईमध्ये मोर्चा काढत आहे. या मोर्चाला तोडीसतोड असलेला मोर्चा काढायचा असेल तर बहुजन समाजातील सर्वाना एकत्र यावे लागेल. वेगेवेगळे मोर्चे काढून काहीही फायदा होणार नाही. मराठा समाजाचा मोर्चा झाल्या नंतर मोर्चा काढल्यास मुंबईमध्येही बहुजन, मुस्लिम मतांचे समीकरण बनेल. आणि याचा फायदा बहुजन मुस्लिम समाजातील उमेदवारांना होईल याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.

फेब्रुवारी - मार्च २०१७ मध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. मुंबईमध्ये ८ लाख बौद्ध आणि अनुसूचित जातीचे, लाखभर अनुसूचित जमातीचे, ५२ टक्के ओबीसी समाजाचे तर १४ टक्के मुस्लिम समाजाचे मतदार आहेत. हि सर्व मते एका ठिकाणी पडतील, महाराष्ट्रात जे नगरपालिका नगरपरिषदा निवडणुकीमध्ये जे झाले त्याचे पुनरावृत्ती मुंबईमध्ये होईल फक्त त्यासाठी सर्वानी एकत्र यायची गरज आहे. मुंबईमध्ये बहुजन मुस्लिम समाज एकत्र आल्यास मुंबई महापालिकेच्या एकूण २२७ पैकी १०३ वॉर्ड असे आहेत त्यामध्ये परिवर्तन घडू शकते. एक गठ्ठा मतांमुळे बहुजन आणि मुस्लिम मतांच्या जोरावर महापालिकेवर निळा झेंडाही फडकू शकतो. १०३ च्या अर्धे जरी उमेदवार निवडून आले तरी उप महापौर, पालिकेच्या समित्यांचे अध्यक्ष पद, नामनिर्देशित नगरसेवक पदे पदरात पाडून घेतली जाऊ शकतात. फक्त त्यासाठी मुंबईमध्ये बहुजन समाजाचा एकच मोर्चा आणि समाजाने एकत्र राहण्याची गरज आहे.

अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad