समाजातील सर्व वंचित घटकांपर्यंत विकास पोहचविणार -देवेंद्र फडणवीस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 December 2016

समाजातील सर्व वंचित घटकांपर्यंत विकास पोहचविणार -देवेंद्र फडणवीस

नागपूर 30 Dec 2016 : समाजातील वंचित घटकांपर्यंत विकास योजनांचा लाभ पोहचविण्यासाठी जनतेला दिलेल्या आश्वासनानुसार ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात आले आहे. तसेच नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी एकच संस्था असावी या दृष्टीने नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करण्याच्या दिलेल्या आश्वासनाची पूर्ती झाली आहे. यामुळे समाजातील सर्वच वंचित घटकांचा विकास होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय दिल्याबद्दल तसेच नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त केल्याबद्दल जनतेतर्फे मुख्यमंत्र्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी महापौर प्रवीण दटके, आमदार सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, डॉ. मिलिंद माने, विकास कुंभारे, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष नानाभाऊ उमाठे, संदीप जोशी, बळवंत जिचकार, डॉ. कल्पना पांडे, नंदाताई ‍जिचकार, भोजराज दुबे, मोहन मते, गोपाल बेहरे, गिरीष देशमुख, जयप्रकाश गुप्ता,विजय महतकर, विवेक तरासे, मीनाताई तिडके, कीर्ती अजमेरा,ओंकारेश्वर गुरव, रमेश चोपडे आदी पदाधिकारी, नगरसेवक तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय मिळावे ही अनेक वर्षांपासून मागणी होती. परंतु त्यांना न्याय मिळत नव्हता. निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला स्वतंत्र मंत्रालय देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार दिलेले आश्वासन पूर्ण केले असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मंत्रालय निर्माण करणे ही पहिली पायरी असून या मंत्रालयाचा विकास करुन ओबीसीतील सर्व घटकांपर्यंत विकास पोहचविण्याचे काम या मंत्रालयाच्या माध्यमातून करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपूर सुधार प्रन्यास संदर्भातही अनेकांनी आश्वासने दिली. परंतु कोणीही एनआयटी बरखास्त केली नाही. नागपूर शहरातील जनतेच्या अपेक्षेनुसार एकाच शहरात दोन विकास संस्था नकोत, हे लक्षात घेऊन आता नागपूर शहरासाठी मेट्रो रिजन ऑथरिटी तयार झाली आहे. त्यामुळे नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करुन विकासाची संपूर्ण जबाबदारी नागपूर महानगरपालिकेची राहणार आहे. तर बाहेरचा विकास मेट्रो रिजन करणार असल्यामुळे जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याचे काम करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Post Bottom Ad