मुंबई : मुंबई शारीरिक शिक्षण मंडळातर्फे आयडियल स्पोर्ट्स अँकॅडमी सहकार्याने कबड्डी, खो-खो, लंगडी खेळांचा अंतर्भाव असलेल्या ७४व्या आंतरशालेय हिंद करंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १0 ते १२ जानेवारी दरम्यान वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिरात स्पर्धा भरेल. तिन्ही खेळांच्या स्पर्धेत हिंद करंडकाच्या नियमावलीप्रमाणे सर्वाधिक गुण घेणार्या शाळेच्या मुले विभागासाठी प्रतिष्ठेचा फिरता टोपीवाला हिंद करंडक तर शाळेच्या मुली विभागासाठी प्रतिष्ठेचा फिरता राणी लक्ष्मीबाई हिंद करंडक दिला जाणार आहे.
यंदा प्रथमच हिंद करंडक स्पर्धेची कबड्डी स्पर्धा नवीन प्रचलित व प्रो कबड्डीसारख्या नियमानुसार आयोजित करण्याचा निर्णय मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय शेटे यांच्या हिंद करंडक संघटन समितीने घेतला आहे. मुंबई शारीरिक शिक्षण मंडळातर्फे सहभागी होणार्या शाळांच्या कबड्डी संघांसाठी कार्यशाळा २ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता भारतीय क्रीडा मंदिरात आयोजित करण्यात आली आहे. लंगडी स्पर्धा मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाच्या तर खो-खो स्पर्धा अखिल भारतीय खो-खो फेडरेशनच्या नियमानुसार होतील. हिंद करंडक स्पर्धेमधील तिन्ही अथवा कोणत्याही एका खेळात प्रथम येणार्या २४ शाळांना भाग घेता येईल. स्पर्धेची प्रवेशिका २३ डिसेंबरपर्यंत उपलब्ध आहे. तरी याबाबत सविस्तर माहितीसाठी संबंधित शाळांनी हिंद करंडक प्रवेशिकेसाठी स्पर्धेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. गो. वि. पारगावकर अथवा समन्वयक डॉ. ढोकरट, मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाचे कार्यालय, भारतीय क्रीडा मंदिर, वडाळा, मुंबई-३१ यांच्याशी संपर्क साधावा.