मुंबई: 27 डिसेंबर 2016
मुंबई महापालिकेत सत्तेवर असलेले शिवसेना आणि भाजपवाले आपल्या जातीय राजकारणासाठी आता शालेय विद्यार्थ्यांचा वापरही करू लागले असून अशा जातीयवादी सत्ताधाऱ्यांना आगामी महापालिका निवडणुकीत सत्तेवरून खाली खेचा, असे आवाहन समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. अबु असीम आझमी यांनी मुंबईकरांना केले आहे. नाताळाच्या दिवशी महापालिका शाळांमधील उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांना सुटी न देण्याच्या महापालिका प्रशासनाच्या निर्णयावर त्यांनी सडकून टीका केली आहे.
सोमवारी मुंबईतील महापालिका शाळांमधील मराठी आणि हिंदी माध्यमातील विद्यार्थ्यांना नाताळानिमित्त सुटी देण्यात आली होती. तर महापालिकेच्या उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना मात्र नाताळाच्या दिवशी सुटी देण्यात आली नव्हती.महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या या अजब कारभारावर भाष्य करताना मा.अाझमी म्हणाले की, खरे तर मुलांमध्ये एकतेची भावना रुजवणे याला प्राधान्य देण्याची गरज आहे. मात्र महापालिका प्रशासन जर शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये जातीय आधारावर भेदभाव करत असेल, तर ही बाब निश्चितच निषेधार्ह आहे.मध्यंतरी महापालिका शाळांमधील सरसकट सर्व विद्यार्थ्यांना सुर्यनमस्कार करण्याची सक्ती करण्यात आली होती. महापालिका प्रशासनामार्फत घेतलेले अशा पद्धतीचे निर्णय पाहता महापालिकेतील सत्ताधारी आपल्या जातीयवादी राजकारणासाठी महापालिका शाळांमधील मुलांचाही वापर करत आहेत, ही बाब स्पष्ट होते. आपल्या राजकारणासाठी शालेय मुलांच्या मनात जातीयवाद निर्माण करण्याचे हे उद्योग महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी बंद करावेत, असे सांगत आगामी महापालिका निवडणुकीत अशा जातीयवादी सत्ताधाऱ्यांना सत्तेवरून खाली खेचा असे आवाहन त्यांनी मुंबईकरांना केले आहे.