मुंबई : मुंबईतील अनेक उड़डाणपुलांचे भाग खराब झाल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची समस्या उद़भवत आहे. त्यामुळे उड्डाणपुलांच्या पुष्ठभागाची डागडुजी करुन त्याचे डांबरीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याअंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील लालबाग आणि शीव येथील उड्डाणपूल तसेच चिंचपोकळी रेल्वे स्थानकाजवळील ऑर्थर रोड रेल्वे पुलांची कामे हाती घेवून त्यावर मॅकेनाईज मास्टीक अस्फाल्टचा थर चढवला जाणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष, यशोधर (शैलेश) फणसे यांनी दिली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील संत ज्ञानेश्वर उड़डाणपूल हा मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने बांधलेला असून नोव्हेंबर २०१२ मध्ये महापालिकेने ताब्यात घेतला आहे. परंतु या उड्डाणपुलाचा दोष दायित्व अर्थात हमी कालावधी संपुष्ठात आल्यामुळे या पुलावर पडलेले खड्डे तसेच काही ठिकाणी खराब झालेला भाग यांची डागडुजी केली नव्हती. परिणामी वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती तसेच पुष्ठभागाची मलमपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्टॅक कमिटीच्या शिफारशीनुसार, मॅकेनाईज मास्टीकचा वापर यासाठी करण्यात येणार आहे. या पुलाच्या कामांसाठी १२.४६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. यासाठी चार कंपन्यांनी निविदा भरली होती. त्यात एका पात्र कंपनीची निवड करण्यात आली असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष, यशोधर (शैलेश) फणसे यांनी सांगितले.
शहरातील चिंचपोकळी स्टेशन येथील ऑर्थर रोड रेल्वे मार्गावरील पूल तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील शीव रुग्णालयासमोरील उड्डाणपुलावरही पावसामुळे खड्डे तसेच काही भाग खराब झालेला आहे. या दोन्ही पुलांचीही कामे हाती घेण्यात येत आहेत. या दोन्ही पुलांसाठीही ३.९३ कोटी रुपये खर्च केले जाणार असून यासाठीही कंञाटदार कंपनीची निवड करण्यात आली असून स्थायी समितीच्या मान्यतेनंतर या कामांना सुरुवात होऊन मुंबईकरांना वाहतुकीसाठी चांगल्याप्रकारची उड्डाणपुलेही उपलब्ध होतील, असे फणसे यांनी स्पष्ट केले.
मस्जिद बंदर येथील कर्नाक पुलाच्या कामाला लवरकच सुरुवात
मस्जिद बंदर येथील १४५ वर्षे जुना असलेला कर्नाक बंदर हा उड़डाणपुल धोकादायक ठरल्यामुळे रेल्वेच्या मदतीने तो महापालिकेने तोडण्यात आला आहे. परंतु हा पूल तोडल्यानंतर मस्जिद बंदर पूर्व व पश्चिम दिशेचा संपर्क तुटलेला असून नागरिकांना वळणाचा प्रवास करत जावे लागत आहे. आता या रखडलेल्या पुलाचेही काम मार्गी लागले असून यासाठी ५३.०८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. एकूण १५० मीटर लांबी आणि २६.५ मीटर रुंदीच्या या उड्डाणपुलाची पाच स्पॅनमध्ये उभारणी केली जाणार आहे. स्टील गर्डर, पी.एस.सी. गर्डर व आर.सी.सी. डेक स्लॅब चे बांधकाम केले जाणार आहे, असे यशोधर (शैलेश) फणसे यांनी स्पष्ट केले.