दानवेंनी नैतिकतेच्या आधारावर आपल्या पदाचा राजिनामा द्यावा - अबु आझमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 December 2016

दानवेंनी नैतिकतेच्या आधारावर आपल्या पदाचा राजिनामा द्यावा - अबु आझमी

मुंबई 29 Dec 2016 - भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्य निवडणुक आयोगाने औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून किमान आता तरी नैतिकतेच्या आधारावर दानवेंनी राजिनामा द्यावा, अशी मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. अबु असीम आझमी यांनी केली आहे. तसेच दानवेंना राज्य सरकारने दिलेला राजशिष्टाचार प्राप्त व्यक्तीचा दर्जाही काढून घ्यावा असेही आझमी म्हणाले. 
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषदांच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान औरंगाबाद येथील पैठणच्या सभेत बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष दानवेंनी मतदानाच्या आदल्या दिवशी आलेल्या लक्ष्मीचे स्वागत करा, असे वक्तव्य केले होते. दानवेंचे हे वक्तव्य म्हणजे मतदारांना पैशाचे आमिष दाखवण्याचा प्रकार असल्याचा आरोप करत विरोधकांनी त्यांच्या विरोधात राज्य निवडणुक आयोगाकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने केलेल्या चौकशीअंती दानवेंनी आचारसंहिता भंग केल्याचा निष्कर्ष राज्य निवडणुक आयोगाने काढला असून औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना दानवेंच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाबद्दल मा. आझमी यांनी राज्य निवडणुक आयोगाचे अभिनंदन केले असून दानवेंवर कठोर कारवाईची मागणी केली.तसेच निवडणुक आयोगाच्या आदेशानंतर किमान आता तरी चूक मान्य करून दानवेंनी नैतिकतेच्या आधारावर आपल्या पदाचा राजिनामा द्यावा अशी मागणीही आझमी यांनी केली. या शिवाय राज्य सरकारने दानवेंना जो राजशिष्टाचार प्राप्त व्यक्तीचा दर्जा दिला आहे, तो अधिकारही काढून घेण्याची मागणीही त्यांनी केली. ते पुढे म्हणाले की, भाजप हा पक्ष फक्त नैतिकतेच्या गप्पा मारतो, प्रत्यक्षात मात्र सर्वाधिक भ्रष्टाचार हा त्यांच्याच पक्षात असून नोटाबंदीनंतरच्या कारवाईत बेकायदेशीरपणे पैसे बाळगणाऱ्यांमध्ये भाजपचेच सर्वाधिक लोक सापडल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्यांचे खायचे दात वेगळे आहेत, आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

Post Bottom Ad