ई विभाग कार्यालय यांच्या सौजन्याने व लोककल्याण नागरी सेवा सहकारी संस्था यांच्या सहकार्याने वीरमाता जिजाबाई भोसले उड्डाणपुलाखाली नव्याने तयार करण्यात आलेल्या वातानुकूलित शौचालय व स्नानगृहाचे उद्घाटन अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे यांच्या हस्ते व स्थानिक नगरसेविका समिता नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक २७ डिसेंबर २०१६ रोजी पार पडले. या समारंभास उप आयुक्त (घ.क.व्य.) विजय बालमवार, उप आयुक्त (परिमंडळ – १) सुहास करवंदे, ‘बी’ विभागाचे सहाय्यक आयुक्त उदय शिरुरकर, संजय नाईक हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, स्थानिक नगरसेविका समिता नाईक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे काम पूर्णत्वास गेले असून याचे उद्घाटन माझ्या हस्ते झाल्यामुळे मनस्वी आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेमध्ये घनकचरा व्यवस्थापन विभाग खूप मोठा असून स्वच्छतेमध्ये १४७ व्या क्रमांकावर असलेली बृहन्मुंबई महापालिका अग्रस्थानावर आणण्याचे काम माझ्या कारकीर्दीत मला करता आले. यासाठी सकाळी ६ वाजता चौकीवरील सफाई कर्मचाऱयांचे हजेरी पुस्तक तपासून अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱयांना निलंबित करण्याची कार्यवाही केली. यामुळे संपूर्ण मुंबईत स्वच्छतेचा चांगला संदेश देता येऊन पुरस्कार स्विकारण्यासाठी दिल्लीला जाण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्यासोबतच स्थानिक नगरसेविका समिता नाईक यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
स्थानिक नगरसेविका समिता नाईक यांनी मार्गदर्शन करताना, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे यांच्या महत्वपूर्ण सहकार्यामुळे हे काम पूर्णत्वास गेल्याचे आवर्जून नमूद केले. यासाठी ई विभाग कार्यालयातील अधिकाऱयांचे सुध्दा बहुमोल सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे यांच्या हस्ते फित कापून कोनशिलचे अनावरण करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी वातानुकूलित शौचालय व स्नानगृहाची पाहणी करुन समाधान व्यक्त केले.