मुंबईकरांचा प्रवास सुखद करण्यासाठी ५५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची घोषणा केली जाणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 December 2016

मुंबईकरांचा प्रवास सुखद करण्यासाठी ५५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची घोषणा केली जाणार

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास सुखद करण्यासाठी ५५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची घोषणा शनिवार, २४ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केली जाणार आहे. त्यामध्ये मुंबई शहर वाहतूक प्रकल्प (एमयूटीपी-३) अंतर्गत ११ हजार ९४७ कोटी रुपये, वांद्रे-विरार एलिव्हेटेड मार्गासाठी २0 हजार कोटी , सीएसएमटी-पनवेल एलिव्हेटेड मार्गासाठी १५ हजार कोटी, वसई-विरार-पनवेल मार्गासाठी ९ हजार कोटी रुपयांचा समावेश आहे. त्यातच नव्या ४७ लोकलचाही समावेश आहे. या लोकल संपूर्णता एसी असण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबईच्या लोकल विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुंबई रेल्वे विकास महामंडळा (एमआरव्हीसी)तर्फे विविध प्रकल्प राबवण्यात येत आहेत. महामंडळातर्फे एमयूटीपी-३ चे प्रकल्प राबवले जाणार आहेत. तर उर्वरित प्रकल्पांपैकी केंद्रीय मंत्रिमंडळाची अद्यापि मान्यता न मिळालेल्या वसई-विरार-पनवेल एलिव्हेटेड मार्गास सर्वात प्रथम सुरुवात होणार आहे. सुमारे सहा वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा रेल्वेचा मानस आहे. एमयूटीपी-३ प्रकल्पांबाबत रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारमध्ये परस्पर सामंजस्य करार देखील शनिवारी पार पडणार आहे. त्याव्यतिरिक्त इतर प्रकल्पांसाठी रेल्वे आणि राज्यामध्ये करारदेखील केले जाणार असल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक-अध्यक्ष प्रभात सहाय यांनी शुक्रवारी दिली. या वेळी पश्‍चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक जी. सी. अग्रवाल, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा आणि इतर वरिष्ठ अधिकारी सहभागी होते.

एमयूटीपी-३ - १0 हजार ९४७ कोटी रुपये

विरार-डहाणू चौपदरीकरण - ३,५५५ कोटी रुपये

ऐरोली-कळवा लिंक - ४२८ कोटी रुपये

नवीन डब्यांची खरेदी - २,८९९ कोटी रुपये

स्टेशनवरील अपघात रोखण्यासाठी योजना - ५२0 कोटी रुपये

पनवेल-कर्जत जोडमार्ग - २,६१८ कोटी रुपये

एलिव्हेटेड मार्ग

सीएसएमटी-पनवेल एलिव्हेटेड मार्ग खर्च - १५ हजार कोटी रुपये.

सीएसएमटी-पनवेल एलिव्हेटेड मार्गामुळे हे अंतर ४५मिनिटांत पूर्ण होणार आहे. २00९-१0 च्या रेल्वे अर्थसंकल्पात पहिल्यांदा या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती.

वांद्रे-विरार एलिव्हेटेड मार्गाचा खर्च सुमारे २0 हजार कोटी रुपये

वसई-विरार-पनवेल जोडमार्ग ९ हजार कोटी रुपये


राज्यात रेल्वेचे २२ हजार कोटी रुपयांचे ९ नवीन रेल्वे मार्ग राज्यात नव्याने होणार्‍या रेल्वे प्रकल्पांना वेग मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. राज्यातील रेल्वेचे विविध २२ हजार कोटी रुपयांचे ९ नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प होणार आहेत. हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारमध्ये एक संयुक्त करार करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी मुंबई दौर्‍यावर असून त्यांच्या हस्ते अनेक प्रकल्पांचे उद््घाटन व शुभारंभ होईल. याच उद््घाटन कार्यक्रमात ९ रेल्वे प्रकल्पांचा संयुक्त करारही होणार आहे. याबाबत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा यांनी सांगितले की, यात अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वे मार्ग, वर्धा-यवतमाळ-नांदेड,वडसा-गडचिरोली, नागपूर-नागभिड, पुणे-नाशिक, मनमाड-धुळे-इंदोर, गडचंदूर-अदिलाबाद, बारामती-लोणाद, कोल्हापूर-वैभववाडी असे नवीन रेल्वे मार्ग काही वर्षांत बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पांची एकूण किंमत ही २२ हजार कोटी रुपये आहे. महाराष्ट्रासोबत प्रथमच अशा प्रकारचा संयुक्त करार आहे. यामुळे राज्यातील हजारो कोटींचे रेल्वे प्रकल्प मार्गी लागण्यास मदत मिळणार आहे.

Post Bottom Ad