नवीन वर्षात शहरातील अतिक्रमणाने वेढलेले पदपथ मोकळे होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 December 2016

नवीन वर्षात शहरातील अतिक्रमणाने वेढलेले पदपथ मोकळे होणार

मुंबई – मुंबईतील आता अतिक्रमणाने वेढलेले पदपथ लवकरच मोकळे करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र धोरणाला प्रशासनाकडून मंजुरी मिळाली आहे. पालिका क्षेत्रातील पदपथांचे आकार, पादचा-यांची संख्या आदी विविध बाबींचा अभ्यास करुन महापालिकेने या धोरणातील मार्गदर्शक तत्वे तयार केली आली आहेत. धोरणामध्ये पादचा-यांची संख्या अधिक असणा-या रेल्वे स्थानकांसारख्या भागात पदपथांची रुंदी अधिक ठेवण्यासोबतच पदपथांच्या सलगतेचाही प्राधान्याने विचार करण्यात आला आहे. तसेच पदपथांवरील २.२० मीटर एवढा भाग मोकळा ठेवणे आता बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेच्या रस्ते व वाहतूक खात्याचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी दिली. 
पदपथावरील केवळ पादचा-यांसाठी असणारा भाग हा किमान १.८० मीटर रुंदीचा असावा व या भागाच्या वरील २.२० मीटर एवढी जागा मोकळी ठेवणे आवश्यक करण्यात आले आहे. या अंतर्गत पदपथापासून २.२० मीटर उंचीपर्यंतच्या जागेत कोणत्याही प्रकारचे फलक, छप्पर बसविता येणार नाहीत. ज्यामुळे डोक्यावर काही सामान वाहून नेणा-या व्यक्तीला विना अडथळा ये- जा करता येईल; तसेच पदपथावरुन चालणा-या व्यक्तीने हात वर केल्यास त्याचा हाताला काही लागणार नाही किंवा अडथळा येणार नाही. पदपथावर केवळ पादचा-यांसाठी असणा-या भागात उपयोगासाठी व अन्य कारणासाठी कोणत्याही प्रकारचे तात्पुरते वा इतर स्वरुपाचे बांधकाम करता येणार नसल्याचे धोरणात स्पष्ट करण्यात आले आहे. फेरीवाले, विक्रत्यांचे स्टॉल्स, दूरध्वनी उपयोगिता, वाहनतळ यासारख्या विविध व्यवसायिक स्वरुपाच्या कार्यांसाठी पदपथांचा उपयोग होत असल्याचे आढळून येते. यामुळे अनेकदा पादचा-यांना पदपथाचा निट वापर करता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन व पादचा-यांना पदपथाचा नीट वापर करता यावा यासाठी पदपथावरील विविध प्रकारची अतिक्रमणे कायदेशीर प्रक्रियेअंती हटविण्यात येणार आहेत.

धोरणातील महत्वाचे मुद्दे -> पदपथांच्या वरील भागास भेगा, चढ-उतार असू नये तसेच पदपथ हे घसरडे अथवा निसटणारे नसावेत.
> पदपथांची रुंदी वर्दळीच्या वेळेसह दिवसाच्या कोणत्याही वेळी पादचा-यांना योग्यप्रकारे पदपथांचा वापर करता येईल, एवढी असावी.
> पदपथावरील विजेचा खांब, झाड, मार्गदर्शक फलक, टपाल पेटी, कचरा पेटी यासारख्या बाबी एकाच बाजूला असाव्यात.
> पदपथावरील कोणत्याही वाहनतळाची नोंदणी अथवा पुनर्नेांदणी केली जाणार नाही. अपवादात्मक परिस्थितीमध्ये वा दुर्मिळ प्रकरणांमध्ये अशा प्रकाराची परवानगी ही १५ दिवसांपेक्षा अधिक असणार नाही.
> पदपथावर कोणत्याही प्रकारचे तात्पुरत्या स्वरुपाचे 'स्ट्रक्चर' उभारण्यासाठी यापुढे अतिरिक्त महापालिका आयुक्तांची पूर्वपरवानगी आवश्यक असेल.
> परवानगी देताना संबंधित पदपथावर १.५ मीटर एवढी जागा पादचा-यांसाठी मोकळी सोडणे बंधनकारक असणार आहे.
> पदपथाच्या दोन्ही बाजूंना सुरक्षाखांब बसविण्याबाबत मार्गदर्शक सूचनांचा अंतर्भाव धोरणामध्ये आहे.
> पदपथावरुन चालणा-या पादचा-यांना जोड रस्ता व मार्गिकेच्या ठिकाणी पदपथावरुन खाली उतरण्याचा व नंतर पदपथावर चढण्याचा त्रास होऊ नये, यासाठी पदपथांची सलगता कायम ठेवण्यात येणार आहे.
> पदपथावरील फर्निचर पदपथावर असणारे फायर हायड्रंट, विद्युत पेटी, दिव्याचे खांब, कच-याचे डबे, झाडे, मार्गदर्शक फलक, दूरध्वनी पेट्या यासारख्या अनेक बाबी या पदपथावरील तिस-या भागात म्हणजे 'स्ट्रीट फर्निचर' च्या भागात असणार आहेत.
> पदपथापासून २.२० मीटर उंचीपर्यंतच्या जागेत कोणत्याही प्रकारचे फलक, छप्पर बसविता येणार नाहीत.
> पदपथावर केवळ पादचा-यांसाठी असणा-या भागात कोणत्याही प्रकारचे तात्पुरते वा इतर स्वरुपाचे बांधकाम करता येणार नाही.

Post Bottom Ad