डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालिका प्रशासन सज्ज - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 December 2016

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालिका प्रशासन सज्ज

मुंबई - महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६०व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे चैत्यभूमी परिसर, शिवाजी पार्क परिसर, दादर रेल्वे स्थानक, राजगृह, हिंदू कॉलनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय(वडाळा) व लोकमान्य टिळक (कुर्ला) टर्मिनस येथे आवश्यक त्या सर्व नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करुन महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. या सर्व ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांसाठी पुरविण्यात येत असलेल्या नागरी सेवा-सुविधांचा लाभ घ्यावा, असे महापालिका प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच दिनांक ६ डिसेंबर २०१६ रोजी भारताच्या कानाकोपऱयातून लाखोंच्या संख्येने अनुयायी चैत्यभूमी (दादर) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतिंना आदरांजली वाहण्यासाठी येतात. अनुयायांनी आपल्या समवेत लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी, दर्शन रांगेतून अत्यंत शिस्तबद्धरित्या दर्शन घ्यावे, असे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

येणाऱया अनुयानांना आवश्यक त्या सर्व नागरी सेवा-सुविधा उत्कृष्टप्रकारे मिळाव्यात म्हणून महानगरपालिकेने चैत्यभूमी, शिवाजी पार्क येथे अनुयायांना सुसज्ज शामियाना व अति महत्त्वाच्या व्यक्ती कक्षासह नियंत्रण कक्षाची व्यवस्था केली आहे. शिवाजी पार्क नियंत्रण कक्षाशेजारी, सूर्यवंशी सभागृह मार्ग व चैत्यभूमी येथील तोरणा प्रवेशद्वाराजवळ तसेच अन्यठिकाणी सुमारे ११ रुग्णवाहिकांची सेवा उपलब्ध करून दिली आहे.

शिवाजी पार्क मैदानात येणाऱया अनुयायांसाठी १ लाख २० हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या मंडपात तात्पुरता निवारा केला असून शिवाजी पार्क मैदानात व वेगवेगळ्या ठिकाणी २०० शौचकुपे असलेली फिरती शौचालये तसेच रांगेत असणाऱया अनुयायांसाठी शौचकुपे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पिण्याच्या पाण्याच्या ३२० नळांची व्यवस्था, रांगेत व परिसरात असणाऱया अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्याचे १५ टँकर्स, कर्मचारी व वाहतूक व्यवस्थेमार्फत संपूर्ण परिसराची स्वच्छता, संपूर्ण परिसरात विद्युत व्यवस्था, अग्निशमन दल सेवा तसेच अग्निशमन दलामार्फत चैत्यभूमीलगत चौपाटीवर जीवरक्षकांसह बोटीची व्यवस्था करण्यात आली आहे.

चैत्यभूमीतील आदरांजलीचे चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क येथे मोठ्या पडद्यांवर थेट प्रक्षेपण करण्यात येत आहे. शिवाजी पार्क येथे ४६९ स्टॉल्सची रचना करण्यात आली आहे. वडाळा, दादर (पूर्व) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय येथे तात्पुरत्या निवाऱयाची व्यवस्था, सदर परिसरात फिरती शौचालये, स्नानगृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि वैद्यकीय कक्षाची सोय करण्यात आली आहे. तसेच जी/उत्तर, दादर (पश्चिम) रेल्वे स्थानकाजवळ आणि एफ/उत्तर, दादर (पूर्व) स्वामीनारायण मंदिराजवळ नियंत्रण कक्ष / माहिती कक्ष, फिरती शौचालये, स्नानगृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि वैद्यकीय कक्षाची सोय करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान (राजगृह) येथेही नियंत्रण कक्ष आणि वैद्यकीय कक्ष उभारण्यात आला आहे.

महापालिकेच्या एल विभाग – लोकमान्य टिळक (कुर्ला) टर्मिनस परिसरात नियंत्रण कक्ष, आरोग्य सेवा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्काऊट गाईड सभागृह येथे भिक्कू निवासाची व्यवस्था, शिवाजी पार्क मैदानात धुळीचा त्रास रोखण्याकरीता पायवाटांवर आच्छादनाची व्यवस्था, शिवाजी पार्क मैदान व चैत्यभूमी या दोन ठिकाणी अनुयायांना मार्गदर्शनाकरीता १०० फूट उंचीचा निदर्शक फुग्याची व्यवस्था, भ्रमणध्वनी चार्जिंगकरीता शिवाजी पार्क मैदानात ३०० पॉइंटची व्यवस्था, फायबरच्या तात्पुरत्या २०० न्हाणीघराची व्यवस्था तसेच इंदू मिलच्यामागे शौचालयाची व स्नानगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे.

पालिकेचे सुमारे ७५० स्वच्छता कर्मचारी दिनांक ४ ते ७ डिसेंबरच्या दुपारपर्यंत कार्यरत राहणार आहेत. तसेच याकामी नेमलेल्या कर्मचाऱयांची ६-६ तासांची अश्या ४ कर्तव्य कालावधीत नेमणूक करण्यात आली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व अनुयायांना नागरी सेवा-सुविधा देण्यासाठी महापालिका सुसज्ज असून अनुयायांनी या सेवा-सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर व महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांनी संयुक्तरित्या केले आहे.

Post Bottom Ad