राज्यात गुन्हेगारांना राजाश्रय मिळत असल्यानेच कायदा सुव्यवस्थेची स्थिती गंभीर : धनंजय मुंडे
नागपूर, दि. 16 :- गुंडांना राजाश्रय मिळत असल्यानेच राज्यात महिला व पोलिसांवरील हल्ले वाढले आहेत. खून, दरोडे, चोऱ्या, बलात्कार, विनयभंग, बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या सर्वाधिक घटना घडलेल्या पहिल्या तीन राज्यांमध्ये महाराष्ट्राचं स्थान असणं ही दुर्दैवी, लाजीरवाणी, चिंताजनक बाब असल्याचं सांगून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अपयशावर सभागृहात कडाडून हल्ला चढवला.
राज्यातील ढासळत्या कायदा-सुव्यवस्थेची आकडेवारी उदाहरणांसह सादर करुन त्यांनी 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा...' असा सवालही सरकारला विचारला. विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावांतर्गत 'राज्यातील ढासळत्या कायदा-सुव्यस्थे'वर चर्चा उपस्थित करताना धनंजय मुंडे यांनी राज्य व केंद्राच्या गुन्हे अहवालाचा संदर्भ देत गेल्या दोन वर्षात राज्यात वाढलेली गुन्हेगारी व ढासळलेल्या कायदा-व्यवस्थेची चिरफाड केली.
मुंडे यावेळी म्हणाले की, सत्तारुढ पक्षाने गुंडांना राजकारणात प्रवेश देण्यास सुरुवात केल्यानं राजकारणाचं मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीकरण झालं आहे. गंभीर गुन्हे असलेल्यांना मोठी पदे मिळत आहेत. खून, हत्या, तोडफोड, गोळीबार, महिलांवरील अत्याचारासारख्या गुन्ह्यांमध्ये सत्तेतील राजकीय नेतृत्वाचा सहभाग ही गंभीर बाब आहे. राज्याचे मंत्री गुन्हेगारीत सहभागी होतात, गुन्हेगारीला समर्थन देतात, मंत्र्यांच्या दादागिरीतंच राज्याच्या ढासळत्या कायदा-सुव्यवस्थेचं मूळ असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला.
राज्यात सातत्याने वाढत असलेल्या गुन्हेगारीची माहिती देताना मुंडे म्हणाले की, राज्यात दर 3 मिनिटाला, 2 दखलपात्र गुन्हे दाखल होत आहेत. या सरकारच्य काळात अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या घटनांमध्ये 32 टक्के वाढ झाली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना 17 टक्क्यांनी वाढल्या आहेत. अनुसुचित जाती, जमातींच्या बांधवांवरील हल्ले वाढले आहेत. समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिसांवरील हल्ल्यांचा वाढत्या घटना व त्यात राजकीय व्यक्तींचा सहभाग ही गंभीर बाब असल्याचे सांगून मुंडे यांनी त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरले.
मुख्यमंत्र्यांचं गाव असलेल्या नागपूरात गुन्हेगारी शिखरावर असल्याचे सांगून नागपूरची ओळख राज्याची क्राईम कॅपिटल अशी झाली आहे. वेळीच उपाययोजना न केल्यास नागपूर लवकरच देशाची क्राईम कॅपिटल होईल, अशी भीतीही मुंडे यांनी व्यक्त केली. नागपूरमध्ये नाईट लाईफ सुरु करणे हे कुठल्या संस्कृतीत बसते, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
नागपूरच्या मेयो रुग्णालयातील महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन करणाऱ्या सत्तारुढ पक्षाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी मुंडे यांनी आपल्या भाषणात केली. नागपूरातील गुंड मुन्ना यादव याला मुख्यमंत्र्यांकडून मिळत असलेल्या संरक्षणाबद्दलही मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर कडाडून हल्ला चढवला. इफेड्रीनसारख्या अमली पदार्थाची चोरी करणाऱ्या रॅकेटचाही त्यांनी पर्दाफाश केला. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती अधिक गंभीर होण्याआधीच आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याची मागणीही मुंडे यांनी केली.