मुंबई, दि. १ डिसेंबर २०१६ : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) च्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) पनवेल तालुक्यातील मौजे कोन येथील २४१७ सदनिकांची संगणकीय सोडत गिरणी कामगारांकरिता शुक्रवार, दि. २ डिसेंबर २०१६ रोजी सकाळी दहा वाजता वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात काढण्यात येणार आहे. सदर सोडतीकरिता प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून म्हाडा प्रशासन सज्ज झाले आहे.
एमएमआरडीएतर्फे बांधण्यात आलेल्या प्रत्येकी १६० चौरस फुटाच्या दोन सदनिका (परिस्थितीनुरूप शक्य असलेली जोडघरे) या प्रकारे प्रत्येकी एका युनिटसाठी सहा लाख रुपये आकारून गिरणी कामगारांना वितरित करण्यात येणार आहे. सोडत प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आलेल्या गिरणी कामगार / वारस यांची माहिती म्हाडाच्या https://mhada.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर सोडतीमध्ये म्हाडाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या १,४८,७११ गिरणी कामगार / वारस यांच्या यादीमधून सन २०१२ च्या सोडतीमध्ये यशस्वी झालेले अर्जदार, सन २०१२ च्या सोडतीतील यशस्वी अर्जदारांपैकी अंतिमतः अपात्र झालेल्या अर्जदारांऐवजी कार्यान्वित करण्यात आलेल्या प्रतीक्षा यादीमधील अर्जदार तसेच म्हाडाच्या गिरणी कामगारांसाठी मे - २०१६ मध्ये काढण्यात आलेल्या सोडतीतील यशस्वी अर्जदार या सोडतीतून वगळण्यात येऊन एकूण १,३८,९८६ अर्जदारांचा या सोडत प्रक्रियेत समावेश राहील. स्वान मिल कुर्ला / शिवडी या मिलच्या अर्जदारांना मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून या सोडतीमध्ये समाविष्ट करण्यात येईल.