नवी दिल्ली : सरकारने पाचशे-हजारच्या नोटा चलनातून बाद केल्यामुळे देशातील चलनव्यवहारात निर्माण झालेली नोटांची टंचाई आणि गैरसोय जानेवारीच्या मध्यावधीपर्यंत संपुष्टात येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कारण सध्या नोटांच्या छपाईचे काम वेगाने सुरू असून आगामी काळात नोटांची मागणी आणि पुरवठा यातील तफावत दूर होण्यास मदत होणार आहे. जानेवारीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत देशातील चलनात ९ लाख कोटींच्या विविध मूल्यांच्या नव्या नोटा दाखल होणार आहेत.
डिसेंबरअखेरपर्यंत बाद नोटांच्या माध्यमातून बँकांजवळ सुमारे १५ लाख कोटींची रक्कम जमा हाईल आणि त्या बदल्यात ९ लाख कोटींच्या नव्या नोटा चलनात दाखल होती. हे प्रमाण ५0 टक्क्यांपेक्षा अधिक असेल. देशातील नोटा छापखान्यांची क्षमता आणि वेग लक्षात घेतल्यास फेब्रुवारीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत सुमारे १३ लाख कोटींच्या नव्या नोटा अर्थव्यवस्थेत रुजू होतील. आरबीआयने १0 डिसेंबरपर्यंत सुमारे ४.६ लाख कोटींच्या नोटा अर्थव्यवस्थेत वितरीत केल्या आहेत. ८ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय अचानक जाहीर केला. यामुळे सर्वसामान्य जनतेला दैनंदिन व्यवहार भागवण्यासाठी बँकांसमोर रांगा लावाव्या लागत आहेत. एटीएममधून केवळ दोन हजारांची नोट मिळत असून बाजारात ती सुटी करणे अवघड झाले आहे. यामुळे छोटे व्यवहार करणे जनतेसाठी कठीण जात आहे. चलनातून बाद झालेल्या नोटांची संपूर्ण रक्कम छापण्यासाठी सात महिने लागतील. यामुळे सरकारने २ हजारांची नोट बाजारात आणली. पण ती सुट्टी होत नसल्याने सरकारचा उद्देश फसल्याचे दिसून येत आहे.