मुंबई, दि 22 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचा भूमिपूजन समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 24 डिसेंबर रोजी होणार असून, या समारंभाच्या पार्श्वभूमीवर गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी येथील नियोजित कार्यक्रमस्थळांची पाहणी व तयारीचा आढावा आज सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मान्यवरांनी घेतला.
शिक्षणमंत्री विनोद तावडे व गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्यासह खासदार रावसाहेब दानवे, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे, आमदार राज पुरोहित यावेळी उपस्थित होते. या समारंभासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतील प्रमुख गडकिल्ल्यांची माती व नद्यांचे पाण्याचे कलश आणण्यात येणार आहेत.
विविध संस्था व संघटनांनी आणलेल्या या कलशांचे स्वागत शुक्रवारी (दिनांक 23 डिसेंबर) सकाळी 10 वाजता चेंबूर नाका, मुंबई येथे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत केले जाणार आहे. चेंबूर येथून मिरवणूकीने माती व पाण्याचे कलश सायंकाळी 5 वाजता गेटवे ऑफ इंडिया येथे आणले जाणार आहेत. हे कलश मंत्री महोदय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत.
विविध जिल्ह्यांमधून आणण्यात आलेली पवित्र माती व पाणी मुख्यमंत्री कलशात जमा करतील व 24 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री फडणवीस हे पवित्र कलश गिरगांव चौपाटीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पवित्र कलश घेऊन स्मारकाच्या भूमिपूजन-जलपूजनासाठी स्मारकाच्या जागेवर जाणार आहेत, अशी माहिती यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री पाटील यांनी दिली. या समारंभासाठी करण्यात येत असलेल्या तयारीची पाहणीही आज या मंत्री महोदयांनी केली.