मुंबई / अजेयकुमार जाधव
केंद्रातील मोदी सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा 8 नोव्हेंबरच्या मध्य रात्रीपासून बंद केल्या नंतर मुंबई महानगरपालिकेच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचा घोटाला सुरु असल्याचा आरोप संदिप देशपांडे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केला असून याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. याबाबत महापालिकेने चौकशी न केल्यास व गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्यास आपण स्वता गुन्हा नोंदवू असा इशारा दिला आहे.
500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर या जुन्या नोटा महापालिकेमध्ये घेतल्या जात नव्हत्या. दोन दिवसानंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशानंतर महापालिकेने जुन्या नोटा स्विकारण्यास सुरुवात केली. महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात मालमत्ता कर, पाणी बिल, विविध दाखले यांच्यासाठी नागरिक पैसे जमा करत असतात. पालिकेने जुन्या नोटा घेण्याचे जाहिर केल्या नंतर पालिकेकड़े 500 करोड़हुन अधिक रक्कम जमा झाली होती.
ही जमा रक्कम करताना पालिकेच्या मुलुंड येथील टी विभागात 16 नोव्हेंबरला एका पाळीमध्ये 4 लाख 87 हजार 125 रुपये जमा झाले. यापैकी 2000 च्या 7 नोटा, 1000 च्या 174 तर 500 च्या 572 नोटा होत्या. ही रक्कम बँकेमध्ये जमा करताना 500 व 1000 च्या जुन्या बंद पडलेल्या नोटा एचडीएफसी बँकेमध्ये जमा करण्यात आल्या परंतू नव्या 2000 च्या नोटा जमा झाल्याच नाहित. 2000 च्या नोटांच्या बदल्यात जूने रद्द झालेले चलन बदली करण्यात आल्याचा संशय देशपांडे यांनी व्यक्त केला आहे.
हा प्रकार मुलुंड येथे दिवशी एका पाळीमध्ये घडला आहे. असेच प्रकार दररोज पालिकेच्या 24 वार्ड कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रामध्ये घडले असण्याची शक्यता असल्याने याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून सखोल चौकशी करावी अशी मागणी संदिप देशपांडे यांनी केली आहे. दरम्यान देशपांडे यांच्या हरकतिच्या मुद्द्याच्या अनुषंगाने स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी याप्रकरणी प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले आहेत.