मुंबई : जुन ते सप्टेंबर या चार महिन्यांत बेस्ट बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या २७ हजार २२ फुकट्या प्रवाशांकडून, बेस्टने २३ लाख ७१ हजार रुपये दंडापोटी वसूल केली आहे. विनातिकीट प्रवाशांविरुद्ध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी, प्रवास भाडे अधिक देय असलेल्या प्रवासी भाड्याच्या रकमेच्या दहापट दंडाची रक्कम भरण्याचे नाकारल्यास, एक महिना पोलीस कोठडी किंवा २०० रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा एकत्रितपणे देण्याची तरतूद आहे. बेस्ट बसमधून प्रवास करताना योग्य तिकीट खरेदी करणे हे प्रत्येकाला बंधनकारक आहे. विनातिकीट प्रवास हा सामाजिक गुन्हा आहे. तेव्हा सर्व बस प्रवाशांनी आर्थिक नुकसान आणि मानहानी टाळण्यासाठी योग्य तिकीट, वैध बसपास, तिकीट आणि बसपासवर प्रमाणित केल्याप्रमाणे प्रवास करावा, असे आवाहन बेस्टने केले आहे.