नवी दिल्ली : निनावी देणग्या मिळणार्या राष्ट्रीय पक्षांच्या यादीत केंद्रात सत्तेत असलेला भारतीय जनता पक्ष देशात क्रमांक एकवर असल्याचे एका ताज्या विश्लेषणातून समोर आले आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्मच्या(एडीआर) विश्लेषणानुसार २0१५-१६ या वर्षात भाजपला इतर पक्षांच्या तुलनेत सर्वाधिक ७६ कोटींच्या निनावी देणग्या मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला याच कालावधीत २0 कोटींच्या निनावी देणग्या मिळाल्या आहेत.
एडीआरने जारी केलेल्या माहितीनुसार या वर्षी देशातील सात राष्ट्रीय पक्षांना एकूण १0२ कोटींच्या निनावी देणग्या मिळाल्या. एकूण १७४४ निनावी लोकांनी २0 हजारांपेक्षा जास्त देणग्या दिल्या आहेत. भाजपला ६१३ निनावी लोकांनी एकूण ७६ कोटींच्या तर काँग्रेसला ९१८ निनावी लोकांनी २0 कोटींच्या देणग्या दिल्या आहेत. या देणग्यांचा तपशील राजकीय पक्षांकडून निवडणूक आयोगास पाठविण्यात आला आहे. यात पक्षांना मिळालेल्या बहुतांश देणग्या निनावी स्रोतांकडून मिळाल्याचे यातून समोर आले आहे. २0 हजारांपेक्षा जास्त देणगी देणार्यांची माहिती निवडणूक आयोगाकडे पक्षांना सादर करावी लागते. २00४ पासून ते २0१५ दरम्यान राजकीय पक्षांना सातत्याने रोखीच्या स्वरूपातच देणग्या मिळत असल्याचे यात दिसून आले आहे. राजकीय पक्षांना गत ११ वर्षांपासून मिळणार्या निधीपैकी ६३ टक्के निधी हा रोखीच्या स्वरूपात आहे. पक्षाला मिळालेल्या २0 हजारांपेक्षा कमीच्या देणगीची माहिती भाजप व काँग्रेसने अद्याप निवडणूक आयोगास दिलेली नाही. तर बसपला या कालावधीत २0 हजारांपेक्षा कमीच्या स्वरूपात देणगी मिळालेली नसल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. राष्ट्रीय पक्षांच्या एकूण देणगीच्या रकमेत यंदा ५२८ कोटींची घट झाल्याचेही या अहवालातून समोर आले. २0१४-१५ च्या तुलनेत हे प्रमाण ८४ टक्क्यांनी कमी आहे.