मुंबई महापालिकेतही 'कॅशलेस' ला सुरुवात ! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 December 2016

मुंबई महापालिकेतही 'कॅशलेस' ला सुरुवात !

दुकाने व आस्थापना खात्याशी संबंधित नोंदणी, नूतनीकरण व बदल होणार 'फक्त' ऑनलाईन पद्धतीने
मुंबई / बृहन्मुंबई महानगरपालिकेने 'कॅशलेस' व्यवहाराला प्राधान्य देत 'दुकाने व आस्थापना' खात्याशी संबंधित विविध व्यवहार करण्यासाठी 'फक्त ऑनलाईन' पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला असून याची लवकरच अंमलबजावणी सुरु होणार आहे. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात विविध व्यवसायिक आस्थापना सुरु करण्यासाठी महापालिकेच्या 'दुकाने व आस्थापना' खात्याकडे नोंदणी करणे बंधनकारक असते. तसेच नोंदणी झाल्यावर नूतनीकरण करणे, नोंदणी विषयक माहितीमध्ये बदल करणे यासाठी आतापर्यंत महापालिकेच्या विभाग कार्यालयात जाऊन नोंदणी, नूतनीकरण वा बदल विषयक कार्यवाही करावी लागत असे. मात्र आता या सर्व बाबी फक्त 'कॅशलेस' पद्धतीने म्हणजेच 'ऑनलाईन' पद्धतीने करता येणार आहेत.


बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात दुकान, वाणिज्यिक आस्थापना, उपहारगृह, निवासी हॉटेल्स (Lodge), नाट्यगृह यासारख्या व्यवसायिक आस्थापना सुरु करावयाच्या झाल्यास त्यासाठी महापालिकेच्या दुकाने व आस्थापना खात्याकडे नोंदणी करणे बंधनकारक असते. याप्रकारे नोंदणी केल्यानंतर गरजेनुसार वार्षिक किंवा त्रैवार्षिक पद्धतीने नोंदणीचे नूतनीकरण करावे लागते. तसेच आस्थापनेमध्ये कार्यरत असणारे मनुष्यबळ वाढल्यास किंवा घटल्यास, मालकामध्ये बदल झाल्यास, मालकी हक्काच्या स्वरुपात बदल झाल्यास (e.g. Partnership Firm to Proprietary Firm), आस्थापनेची जागा बदलल्यास किंवा कंपनी असल्यास संचालक मंडळातील बदल याबाबतची माहिती देखील महापालिकेला निर्धारित नमुन्यात देणे बंधनकारक असते.

याप्रमाणे महापालिका क्षेत्रातील विविध व्यवसायिक आस्थापनांची नोंदणी, नूतनीकरण व बदल यासाठी महापालिका मुख्यालायातील वा विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात येऊन निर्धारित शुल्क भरणे सध्या आवश्यक आहे. मात्र आता लवकरच यासाठी फक्त कॅशलेस व ऑनलाईन पद्धतीनेच व्यवहार करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यामुळे संबंधितांना पालिकेच्या कार्यालयाकडे न येता देखील आपल्या आस्थापनेशी संबंधित काम करुन घेणे शक्य होणार आहे.

Post Bottom Ad