मुंबई / प्रतिनिधी
मुंबईकर नागरिकांना महापालिकेकडून पाणी करताना मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असते. पाणी गळतीमध्ये पाणी चोरीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे पाणी गळती रोखण्यासाठी पालिकेने मुंबई उपनगरात मोठ्या प्रमाणात कामे हाती घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी पालिका 50 कोटी रुपये खर्च करणार आहे. तसे प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीत सादर करण्यात आले आहेत.
मुंबईला दरदिवसाला 3750 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. यापैकी 650 दशलक्ष लिटर पाण्याची गळती होत असून 140 दशलक्ष लिटर पाण्याची चोरी होते. यामुळे मुंबई उपनगरातील के पूर्व, पी उत्तर, एस, एन, के पश्चिम, आर उत्तर, एल, एम पूर्व, टी या विभागात पाण्याची गळती थांबवणे, पाणी दुषितीकरण रोखणे आणि इतर कामे केली जाणार आहेत. यासाठी के पूर्व विभागात 6 कोटी 97 लाख, पी उत्तर विभागात 1 कोटी 34 लाख, एस विभागात 5 कोटी 92 लाख, एन विभागात 3 कोटी 6 लाख, के पश्चिम विभागात 11 कोटी 23 लाख, आर उत्तर विभागात 3 कोटी 31 लाख, एल विभागात 7 कोटी 90 लाख, एम् पूर्व विभागात 6 कोटी 7 लाख, तर टी विभागात 4 कोटी 64 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.