मुंबईसाठी 40 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 December 2016

मुंबईसाठी 40 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प

मुंबई - मुंबई शहरासाठी लवकरच 40 हजार कोटी रुपयांची कामे सुरू होणार आहेत. मुंबईची जीवनरेखा असलेल्या उपनगरीय रेल्वेकडे कोणी लक्ष दिले नसल्याने तिचा विकास करण्यासाठी ही रक्कम खर्च होणार असून पुढच्यावर्षी पासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल, अशी घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी वांद्रे टर्मिनस येथे केली.

वांद्रे टर्मिनस ते गोरखपूर गाडीला हिरवा झेंडा, दिवा येथे जलद लोकलना थांबा, नऊ रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा, दादर, भाईंदर तसेच वसई रोड येथील सरकते जिने, पश्चिम रेल्वेवरील दादर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. 7 चे लोकार्पण, तसेच परेवर पंधरा डब्याच्या 12 फेऱयांची सुरुवात आदी सेवांचे लोकार्पण तसेच अनावरण रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते रविवारी वांद्रे टर्मिनस येथे झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, खासदार राजन विचारे, राहुल शेवाळे, डॉ. श्रीकांत शिंदे, गोपाळ शेट्टी, हुसेन दलवाई, जगदंबिका पाल, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार आदी उपस्थित होते.

कल्याण येथे लांबपल्ल्यांच्या गाडय़ांसाठी लवकरच नवीन टर्मिनसचे काम सुरू करण्यात येणार आहे. तसेच 100 स्मार्ट सिटीच्या विकासासाठी नागरी विकास मंत्रालयाचा निधी उपलब्ध होणार आहे. त्याचा फायदा घेऊन ठाणे स्थानकाचा विकास करण्यात येणार असल्याची माहिती प्रभू यांनी यावेळी दिली.

गोरखपूर सारख्या प्रांतासाठी आजपासून ट्रेन सुरू झाली आहे. शनिवारपासून दिल्ली ते उत्तर प्रदेशसाठी हमसफरट्रेन सुरू झाली. आता मुंबईसाठी देखील लवकरच हमसफर ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. कोकणसाठीच्या नव्या ‘तेजस’ ट्रेनमुळे मुंबई ते गोवा हे अंतर तीन तासांनी कमी होणार आहे. या ट्रेनचे वेळापत्रकही तयार आहे. संपूर्ण अनारक्षित अशा अंत्योदय ट्रेनचे डिझाईनही तयार असून ही ट्रेन लवकरच सुरू होणार आहे. तसेच उदय एक्प्रेसची रात्रकालिन सेवाही लवकरच सुरू होणार असल्याची माहिती यावेळी प्रभू यांनी दिली.

वेंडरकडेही पीओएस मशीन!
रेल्वेतून पंतप्रधानांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न साकारण्यासाठी रेल्वे स्थानकांवरील विक्रेत्यांच्याही हाती पीओएस स्वाईप मशीन सोपविण्यात येणार असून, ई-वॉलेट आणि ई-टेंडरींगद्वारे रेल्वेत पॅशलेस व्यवहार वाढविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे रेल्वे मंत्री यावेळी म्हणाले.

आणखी नऊ स्थानकात वायफाय
बोरिवली, अंधेरी, वाशी, बेलापूर, कुर्ला, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा, पनवेल आणि ठाणे येथे मोफत वायफाय सेवेचे आज उद्घाटन करण्यात आले. याआधी दहा स्थानकांवर वायफाय सुविधा यापूर्वीच सुरू झाली आहे. आता यामध्ये आणखी 9 स्थानकांची भर पडली आहे.

Post Bottom Ad