सातारा - चिंचणेर वंदन, ता. सातारा येथील माहेरवाशीण असलेली नवविवाहिता अरुणा मोहिते हिच्या निर्घृण खुनाचे मंगळवारी (6 Dec. 2016) रात्री चिंचणेरमध्ये हिंसक पडसाद उमटले. संतप्त जमावाने दलित वस्तीमध्ये घुसून दुचाकी व चारचाकी वाहने पेटवून देत तुफान दगडफेक केली. त्यामध्ये वाहनांचे व घरांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी 31 जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असून सर्वांना अटक करून दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. जिल्हा पोलिसप्रमुखांनी व जिल्हा प्रशासनाने काल रात्रीपासून दाखवलेली सतर्कता व केलेल्या गतिमान हालचालींमुळे चिंचणेरमधील परिस्थिती नियंत्रणाखाली असून तणाव निवळला आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पोलिसप्रमुख संदीप पाटील यांनी केले आहे.
अरुणा मोहिते या नवविवाहितेचा गावातीलच सिद्धार्थ दणाणे या युवकाने दि. 30 नोव्हेंबर रोजी ठोसेघरनजीक पवनगाव येथे निर्घृणपणे खून केला होता. या घटनेने गावात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी रात्री जिल्हा शासकीय रुग्णालयातही तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. नातेवाइकांनी अरुणा हिच्या मृतदेहाच्या इन कॅमेरा शवविच्छेदनाची मागणी केल्यानंतर रात्री उशिरा मृतदेह पुणे येथे हलवण्यात आला. त्यानंतर रात्री उशीरा चिंचणेर वंदनमध्ये संतप्त पडसाद उमटले. रात्री 11 नंतर गावातील व अन्य गावातील युवक एकत्र जमू लागले. दणाणे याने केलेल्या कृत्याबाबत त्यांच्यामध्ये प्रचंड चिड होती. त्यांचा संताप अनावर झाला. रात्री साडे अकराच्या सुमारास गावात ठिकठिकाणी युवकांचा जमाव रस्त्यावर आला व संशयित आरोपीच्या घराच्या दिशेने जमाव निघाला. संतापलेला जमाव आक्रमक बनत गेला.
खुनाच्या घटनेचा निषेध करत संतप्त जमावाने दलित वस्तीमध्ये घुसून तोडफोडीला सुरुवात केली. चारचाकी, दुचाकींना टार्गेट करत त्यावर मोठ मोठे दगड घालून नुकसान करण्यात आले. एवढ्यावरच हा जमाव थांबला नाही. दिसेल ती वाहने पेटवून देण्यात आली. जाळपोळीला सुरुवात झाल्यानंतर घरामध्ये असणार्या वृध्दांसह कुटुंबियांनी आक्रोश केला. बचावासाठी घरातील आतील दाराला कडी, कुलूप लावून दरवाजे तोडले जाणार नाहीत याची खबरदारी घेतली गेली. बाहेरील जमाव घरात येवू नये यासाठी घरामधील दाराला आतून अवजड वस्तू लावल्या.
दरम्यान, संतप्त जमाव दहशत निर्माण करत होता. काही हल्लेखोरांनी बंद घराचे, पत्र्याचे दरवाचे उचकटून आत जाण्याचा प्रयत्नही केला. परिस्थिती आवाक्याच्या बाहेर जात असल्याचे पाहून तत्काळ या घटनेची माहिती पोलिस मुख्यालयाला देण्यात आली. घटनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी मुख्यालयातून पोलिसांची आणखी कुमक पाठवली. तोपर्यंत चिंचणेर वंदन येथे संतप्त जमावाने सुमारे एक तासाहून अधिक काळात घरांची तोडफोड व वाहनांची जाळपोळ केली. पोलिसांची अतिरिक्त कुमक दाखल झाल्यानंतर मात्र जमाव पांगला.
वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना घटनेची माहिती दिल्यानंतर घटनास्थळाची पाहणी करुन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी सनी रामभाऊ दणाणे (वय 28, रा. चिंचणेर वंदन) या युवकाने तक्रार दिली आहे. सनी दणाणे याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सिध्दार्थ दणाणे याने महिलेचा खून केल्यामुळे संशयितांनी चिडून जावून आपापसात संगनमत करुन मंगळवारी रात्री घोषणाबाजी केली. त्यानंतर घरावर दगडफेक करत घराचा दरवाजा व खिडकीची मोडतोड करुन वाहनांचे नुकसान केले. यावेळी संशयितांनी जातीवाचक शिवीगाळ करत भावना दुखावल्या असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पहाटेपर्यंत पोलिसांची धरपकड मोहीम सुरु होती.
दरम्यान, जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद यादव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, उपजिल्हाधिकारी संजय पाटील यांनी परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी दिवसभर मेहनत घेतली. त्यांच्या मेहनतीला यश आले. दिवसभरात त्यांनी विविध सामाजिक संघटनांशी चर्चा केली. माध्यमांशीही संवाद साधला. सायंकाळपर्यंत सातारा शहरासह चिंचणेरमधील वातावरण नियंत्रणाखाली आणण्यात पोलिसांना यश आले. दिवसभर अफवांचे पीक पसरले होते. मात्र, सोशल मीडियावर कारवाई करू, असा इशारा दिल्यानंतर अफवा थंडावल्या. सायंकाळनंतर चिंचणेरसह सर्वत्र तणाव निवळला आहे. त्यामुळे जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
अटक - दोन दिवसांची पोलिस कोठडी
सागर चव्हाण, सचिन चव्हाण, विनोद बर्गे, सुजित चव्हाण, सागर कदम, ऋषीकेश बर्गे, विकी बर्गे, सतिश कदम, तेजस चव्हाण, वैभव बर्गे, रोहित फडतरे, ऋषी बर्गे, अक्षय बर्गे, प्रतीक बर्गे, संदीप बर्गे, प्रशांत बर्गे, सुनिकेत बर्गे, दत्तात्रय बर्गे, विनोद बर्गे, दिपक बर्गे, यतिन बर्गे, नितीन बर्गे, अमित बर्गे, विनोद यादव, संजय बर्गे, किरण बर्गे, अमित बर्गे, रोहित बर्गे, अमोल बर्गे, विक्रम माने सर्व रा. चिंचणेर वंदन व सुनील माने रा. लावंघर ता. सातारा यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुध्द जाळपोळ, तोडफोड व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.