मुंबई, दि. 23 : राज्यातील महत्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी, तसेच शाश्वत विकासासाठी तरुणांची कल्पकता व ऊर्जा यांचा पुरेपूर वापर करण्याच्या हेतूने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून साकारलेल्या ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ या कार्यक्रमांतर्गत ‘संवाद मालिके’तील पहिला कार्यक्रम आयआयटी, मुंबई येथे सोमवार, दि. 26 डिसेंबर रोजी दु. 2 वाजता होणार आहे. या कार्यक्रमातून स्वतः मुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्राच्या धोरणांविषयी सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. पत्रकार अर्णब गोस्वामी हे या कार्यक्रमाची सूत्रे सांभाळतील.
प्रगतीशील महाराष्ट्राची आराखडा तयार करण्याची तरूणांना संधीराज्यातील लोकसंख्येत 16 ते 35 वयोगटातील तरुणांचे प्रमाण 35 टक्क्यांहून अधिक आहे. या तरुणाईकडे राज्याच्या प्रगतीसाठी अनेक कल्पना व ध्येय-धोरणे आहेत. त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात अवतरण्यासाठी तसेच शासनातील सर्व घटकांशी त्यांचा संवाद घडवण्यासाठी एका योग्य व्यासपीठाची गरज ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ साकार होत आहे. या व्यासपीठाद्वारे तरुणांना 2025 पर्यंतच्या प्रगतीशील महाराष्ट्राचा आराखडा तयार करण्याची संधी मिळेल. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एकत्र आणून राज्यातील 11 गंभीर आव्हानांचे धोरण किंवा कार्यक्रमांमार्फत उपाययोजना केले जाणार आहे. या उपाययोजनांची अंमलबजावणी राज्य सरकारमार्फत होणार आहे.