प्रथमच शाळेमध्ये उदवाहनाची व्यवस्था
मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेच्या एफ-उत्तर विभागातील प्रभाग क्रमांक १७० मधील 'हाजी इस्माईल हाजी अल्लाना' या मराठी, उर्दू आणि हिंदी माध्यमाच्या शाळेचा लोकार्पण सोहळा उद्या सकाळी ठीक ११.०० वाजता युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित आणि महापौर स्नेहल आंबेकर यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
या ठिकाणी पूर्वी पालिका शाळेची तीन माजली इमारत होती. ती पुर्नप्रमाणे निष्कासित करून सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांच्या पाठपुराव्यामुळे येथे तळ मजला अधिक सहा माजली इमारत शाळेसाठी बांधण्यात आली. या नवीन इमारतीत एकूण १२ वर्गखोल्या, एक सभागृह, दोन ग्रीन रूम,अद्यायावत विज्ञान प्रयोगशाळा, एक संगणक प्रयोगशाळा, व्हर्चुअल क्लासरूम तसेच एक भंडारगृह, मुख्यध्यापक कार्यालय, स्वयंपाक गृह, कर्मचारी रूम आणि वाचनालय अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सदर शाळेच्या इमारतीमध्ये अग्निरोधक यंत्रणासह अग्निशमन व्यवस्था असून उदवाहनाचीही सोय करण्यात आलेली आहे. सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांच्या प्रयत्नाने उभारण्यात आलेल्या या शाळेच्या लोकार्पण सोहळ्यास उपमहापौर अलका केरकर, खासदार राहुल शेवाळे, विभागप्रमुख मंगेश सातमकर तसेच खासदार रिटा वाघ उपस्थित राहणार आहे.