चेन्नई - भारताने इंग्लंडवर मिळवलेल्या ऐतिहासिक मालिका विजया बरोबरच अनेक विक्रम नोंदले गेले आहेत. कसोटी कर्णधार विराट कोहलीच्य़ा नावावरही अनेक विक्रमांची नोंद झाली आहे. सलग 18 कसोटी सामन्यात अपराजित राहत विराटने भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा विक्रम मोडीत काढला आहे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग 18 कसोटीत अपराजित राहण्याच्या बाबतीत विराटने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉशी बरोबरी साधली आहे.
गतवर्षी ऑगस्टमध्ये श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटीतील पराभवानंतर विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सलग 18 कसोटीत अपराजित राहिला आहे. यादरम्यान भारताने 14 कसोटीत विजय मिळवले आहेत, तर 4 कसोटी सामने अनिर्णीत राहिले आहेत. याआधी सर्वाधिक कसोटीत अपराजित राहण्याचा भारतीय विक्रम सुनील गावस्कर यांच्या नावे होता. गावस्कर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 1985 ते 1987 या काळात 17 कसोटीत अपराजित राहिला होता.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक कसोटीत अपराजित राहण्याचा आंतरराष्ट्रीय विक्रम क्लाइव्ह लॉइड यांच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिज संघाच्या नावे आहे. जानेवारी 1982 ते डिसेंबर 1984 या काळात लॉइड यांच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिजचा संघ तब्बल 27 कसोटीत अपराजित राहिला होता. तर 1968 ते 1971 या काळात इंग्लंडचा संघ 26 कसोटीत अपराजित राहिला होता. या यादीत ऑस्ट्रेलियन संघ तिसऱ्या क्रमांकावर असून 1946 ते 1951 या काळात ऑस्ट्रेलियन संघ सलग 25 कसोटीत अपराजित राहिला होता.