नागपूर, दि. 15 : राज्यातील सहकारी संस्थांच्या संचालकांनी केलेल्या गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र सहकारी संस्था 1960चे कलम 88 नुसार 1069 व्यक्तींवर 1670 कोटी 90 लाख रुपयांची जबाबदारी निश्चित करण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानसभेत दिली. अहमदनगरसह राज्यातील सहकारी संस्थांच्या 1450 संचालकांनी पैशांच्या केलेल्या अपव्ययाबाबतचा प्रश्न संजय सावकारे यांनी विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना देशमुख बोलत होते.
देशमुख म्हणाले की, सहकारी पतसंस्था किंवा नागरी सहकारी बँकांच्या दोषी संचालक व अधिकारी-कर्मचारी यांच्यावर संस्थेस झालेल्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली असून वसुली करण्यासाठी वसुली प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. राज्यातील 73 नागरी सहकारी बँकाचे व 147 नागरी सहकारी पतसंस्थांचे आदेश निर्गमित करण्यात आलेले असून त्यापैकी 26 नागरी सहकारी बँका व 43 नागरी सहकारी पतसंस्थाचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यानुसार राज्यातील 1069 व्यक्तींवर 1670 कोटी 90 लाख रुपयांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. या नागरी सहकारी बँका व पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्षण करण्यासाठी संचालकांच्या मालमत्तेवर टाच आणून ठेवीदारांची रक्कम परत करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असेही देशमुख यांनी सांगितले. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सुनील शिंदे, हरीष पिंपळे, चंद्रदिप नरके, अनिल गोटे, प्रकाश आबिटकर, संजय केळकर आदींनी सहभाग घेतला.