मुंबई : वर्षाच्या सुरुवातीला देवनार डम्पिंग ग्राऊंडवर आग लागली होती. हि आग विझवण्यासाठी व पुन्हा आग लागल्यास खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन दलाच्या गाड्या, कर्मचारी डम्पिंगवर तैनात करण्यात आले आहेत. सदर आग विझवताना व नंतर याठिकाणी तब्बल पाच महिने तळ ठोकून असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या जेवणावर व पाण्यावर २0 लाख ४४ हजार ३२0 रुपये खर्च केल्याची बाब उजेडात आली आहे.
देवनार डम्पिंग ग्राऊंडवर २८ जानेवारी व त्यानंतर २0 मार्च दरम्यान मोठी आग लागली होती. या आगीवर नियंत्रण करण्यासाठी वेळ लागला होता. या ठिकाणी आग विझवल्या नंतरही छोट्या छोट्या आगी लागतच होत्या. आग विझवण्याचे काम अग्निमशन दलाकडून सतत सुरू होते. त्यामुळे अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान २४ तास काम करत होते. डम्पिंग ग्राऊंडवर जमा असलेल्या काचऱ्यामध्ये मिथेन वायू असल्याने त्याचा शहराला धोका निर्माण झाला होता. यामुळे आगीचे व शहरावर असलेले मिथेन वायूचे संकट पाहता अग्निशमन दलाला डम्पिंगवरच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या दरम्यान अग्निशमन कर्मचाऱ्यांना जेवायला बाहेर जाणे शक्य नसल्याने त्यांना २ वेळच्या जेवणाची, नाश्त्याची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था डम्पिंग ग्राऊंडवरच करण्यात आली. यासाठी ३१ जानेवारी ते १२ जुलै या कालावधीत २0 लाख ४४ हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. या २० लाखापैकी २ लाख रुपये पाण्यासाठी खर्च करण्यात आले आहेत. ही व्यवस्था तातडीने करावयाची असल्याने कोणतीही निविदा न मागवताच मे. सिम्पली डिलिशियस यांच्याकडून ही व्यवस्था करण्यात आली आहे. कोणतेही टेंडर न मागवताच हा खर्च करण्यात आला आहे. याबाबतचा प्रस्ताव कार्योत्तर मंजुरीसाठी महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आल्याने याचे स्थायी समितीत चांगलेच पडसाद उमटण्याची शक्यता आहे.