रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी राज्यात जेट पॅचर (JET PATCHER) अत्याधुनिक यंत्रणेचा वापर सुरु - सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 November 2016

रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी राज्यात जेट पॅचर (JET PATCHER) अत्याधुनिक यंत्रणेचा वापर सुरु - सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 22 : खड्डेमुक्त महाराष्ट्र ही संकल्पना राबविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आधुनिकतेची कास धरली आहे. राज्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी जेट पॅचर (JET PATCHER) या अत्याधुनिक यंत्राच्या वापरास सुरुवात करण्यात आली आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
राज्यात यापूर्वी पारंपारिक पध्दतीने रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येत होते. त्यामुळे रस्त्यांचा दर्जा राखला जात नव्हता तसेच दुरुस्तीसाठी वेळ लागत होता. यावर कायमस्वरुपी पर्याय काढण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. यापुढे राज्यातील प्रमुख मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी प्रायोगिक तत्वावर जेट पॅचर या अत्याधुनिक यंत्राचा वापर करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

जेट पॅचर (JET PATCHER) ही अत्याधुनिक यंत्रणा मोबाईल ट्रकवर बसविण्यात आली आहे. ही यंत्रणा स्वयंपूर्ण एकात्मिक रस्ता दुरुस्ती मशीन आहे. जे विशेषत: रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीसाठी वापरले जाते. यामध्ये एकाच यंत्राव्दारे जेट प्रेशरने खड्डा स्वच्छ केला जातो. त्यानंतर लगेच त्याच पाईपमधून रस्त्यावर इमल्शन डांबराचा जेट स्प्रे करुन टॅक कोट मारला जातो. लगेचच त्याच पाईपमधून डांबर मिश्रीत खडीने खड्डा भरला जातो. ही टेक्नॉलॉजी परदेशात वापरली जात असून या पध्दतीचा विविध देशांमध्ये वापर केला जातो. रस्त्यावंरील खड्डे बुजविण्यासाठी वापरावयाचे सर्व प्रकारचे थर (Layers) एकाच मशीनमधून जात असल्यामुळे या मशीनची गती चांगली आहे.

जेटपॅचर हे यंत्र पैसा, वेळ, सामुग्री, मनुष्यबळ व भांडवली खर्चात बचत करते. हे यंत्र कोल्ड इमल्शन टेक्नॉलॉजी, व धुतलेल्या सामुग्रीचा (खडी रेती) वापर करते. यामुळे दुरुस्त केलेला रस्ता तासाभरात वाहतुकीसाठी खुला करता येतो. या यंत्राने 50 मिमी खोल व आणि 3 चौमी क्षेत्रफळाचा खड्डा दुरुस्त करण्यासाठी जास्तीत जास्त15 मिनिटे लागतात. रस्त्याचा पाया चांगल्या प्रतींचा असल्यास या यंत्राद्वारे करण्यात आलेली खड्डे दुरुस्ती दोन वर्षाहून अधिक काळ टिकू शकते. त्याचबरोबर या यंत्राद्वारे सर्व प्रकारचे थर (Layers) हे या यंत्राद्वारे देण्यात येत असल्यामुळे खड्डे दुरुस्तीची प्रक्रिया जलदगतीने होते. प्रदूषण होत नाही, भेसळ होत नाही आणि उत्पादकताही उच्च दर्जाची असते.

आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानावर आधारित हे मशीन यापूर्वी आयात करण्यात येत होते. या यंत्राचा सार्वजनिक बांधकाम विभागामधील संभाव्य वापर व उपयुक्तता तपासण्यासाठी पुणे प्रादेशिक विभागामधील आंबेगांव तालुक्यातील प्रजिमा 21 व आळंदी शहर,तालुका-खेड या ठिकाणी प्रायोगीक चाचणीसाठी या मशीनव्दारे 21नोव्हेंबर रोजी खड्डे भरण्यात आले आहेत. या प्रकारची 5 यंत्रे राज्यात प्रायोगिक तत्वावर वापरण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहितीही पाटील यांनी दिली आहे. राज्यातील रस्ते दुरुस्तीची उपयोगिता पडताळून येत्या काळात राज्यात कायमस्वरुपी या यंत्राचा वापर सुरु करण्यात येणार असल्याचेही सार्वजनिक बांधकाममंत्री पाटील यांनी सांगितले.

Post Bottom Ad