प्रस्तावित सागरी किनारी रस्त्याच्या भू-तांत्रिक चाचणी कामाची उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 November 2016

प्रस्तावित सागरी किनारी रस्त्याच्या भू-तांत्रिक चाचणी कामाची उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी

मुंबई / प्रतिनिधी
बृहन्मुंबई महानगरपालिकेव्दारे बांधण्यात येणाऱया प्रस्तावित सागरी किनारी रस्त्याचे (COSTAL ROAD) भू – तांत्रिक चाचणी काम गिरगाव चौपाटी येथे सुरु असून या कामाची शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री व मा.पालकमंत्री (मुंबई शहर) सुभाष देसाई तसेच महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दिनांक २६ नोव्हेंबर, २०१६) सकाळी पाहणी करुन या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. 
याप्रसंगी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, सभागृह नेता तृष्णा विश्वासराव, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, स्थानिक नगरसेवक सुरेंद्र बागलकर, नगरसेवक संपत ठाकूर, प्रमुख अभियंता (किनारी रस्ता प्रकल्प) मोहन माचिवाल हे मान्यवर उपस्थित होते.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना म्हणाले की, मुंबईकर नागरिकांसाठी जे एक स्वप्न पाहिले होते, त्याची सुरुवात झालेली बघणे हा समाधानाचा क्षण आहे. भू – तांत्रिक चाचणी कामामध्ये जो दगड लागला आहे, तो टनेलच्या कामासाठी चांगला आहे. त्याचप्रमाणे गिरगाव चौपाटीला व मुंबईतील वाहतूकीला कोणत्याही प्रकारे अडथळा न येता हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महापालिका आयुक्त अजोय मेहता प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना म्हणाले की, २९.२ किमीचे सागरी किनारी रस्त्याचे हे संपूर्ण काम असून पहिल्या टप्प्यात बांदोडकर उड्डाणपूल, मरीन लाइन्स ते वांद्रे सी लिंक पर्यंत या ९.९८ किमीचे काम २0१९ पर्यंत करण्यात येणार आहे.त्यानंतर वांद्रे सी लिंक ते कांदिवली या दुसऱया टप्प्याचे काम करण्यात येणार आहे. या कामाची निविदाप्रक्रिया सध्या सुरु असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.

Post Bottom Ad