मुंबई 24/11/2016 -
पतपेढ्याची नोटाबंदीमुळे आर्थिक कोंडी झाली आहे. याच्या निषेधार्थ राज्यातल्या १६ हजार ६०० पतसंस्था १ डिसेंबर रोजी संपावर जात असल्याची माहिती महाराष्ट्र सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंत शिंदे यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर राज्यातल्या पतसंस्थांचे १००० कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. पतसंस्थांना जुन्या नोटा स्वीकारण्यास तसेच सदस्यांचे पैसे देण्यास रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातल्याने पतसंस्थांची आर्थिक कोंडी झाली आहे. पतसंस्थांमध्ये राज्यातील सामान्य कामगार आणि शेतकऱ्यांच्या ठेवी आहेत.
पतसंस्थांना जुन्या नोटा स्वीकारणे तसेच ग्राहकांना पैसे देण्यास रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातल्यामुळे संस्थांच्या कारभारावर विपरीत परिणाम झाला आहे. या निर्णयामुळे संस्थांच्या दोन कोटी ग्राहकांवर अन्याय झाला असून पतसंस्थांच्या ज्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी ज्या सहकारी बँक आणि राष्ट्रीय बँकांमध्ये आहेत. त्या ठेवी पण परत मिळत नसल्याने पतसंस्था चालवणे कठीण झाल्याची खंत शिंदे यांनी वर्तवली आहे. जुन्या नोटा स्वीकारण्यास निर्बंध घातल्याने ६० ते ७० कोटींचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत.
त्यामुळे अशा पतसंस्था अडचणीत येण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांना आधार वाटणाऱ्या पतसंस्थांना टाळे लागणार का, अशी भीती ग्राहकांना वाटत आहे. संस्थांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाल्याचे महाराष्ट्र सहकारी पतसंस्था फेडरेशनला वाटते असे शिंदे यांनी स्पष्ट केले. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी पतसंस्थाचालकांच्या सहकार खात्याकडे फेर्या वाढल्या आहेत. मात्र, सहकार विभागही याबाबत हतबल असल्याचे दिसत आहे.