मुंबई : 28 Nov 2016
नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधानांनी जाहीर केल्यानंतर या निर्णयात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तब्बल ६३ वेळा नवनव्या सुधारणा केल्या, याचाच अर्थ नोटाबंदीचा निर्णय घेण्यापुर्वी सरकारने नीट पुर्वनियोजन केले नव्हते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई विभागिय अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली आहे. नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी सोमवारी मुंबईत निघालेल्या विरोधकांच्या आक्रोश मोर्चात ते बोलत होते.
केंद्र सरकारने कोणतेही नियोजन न करता देशभरात ८ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू केलेल्या नोटबंदीच्या निर्णयाचे दुष्परिणाम आता प्रत्येक क्षेत्रात दिसू लागले आहेत. बँकांसमोर सर्वसामान्यांच्या रांगा अजूनही कायम असून देशभरातील व्यापारउदीम थंडावला आहे. छाटे व्यापारी, शेतकरी, कामकरी वर्ग या सर्वांनाच या नोटबंदीचा फटका बसला असून ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडण्याच्या बेतात आहे.तसेच या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन स्वरूपाचे विपरित परिणाम होणार असल्याचा दावा अर्थतज्ज्ञ करत आहेत. या सर्व परिस्थितीला केंद्र सरकारची घिसाडघाई कारणीभूत असून नियोजना अभावी हा निर्णय फसत चालल्याचे मा.अहिर म्हणाले. पंतप्रधानांनी हा निर्णय जाहीर केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने आजपर्यंत तब्बल ६३ वेळा त्यात सुधारणा केल्या. यावरून या निर्णयापुर्वी कोणतीही योजना केंद्र सरकारसमोर नव्हती ही बाब सिद्ध होत असल्याचे मा. अहिर म्हणाले. परिणामी सर्वसामान्य नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. पंतप्रधान म्हणतात की हा त्रास फक्त पन्नास दिवस सहन करा, त्यानंतर या निर्णयाचे चांगले परिणाम दिसतील, मात्र पन्नास दिवसांनंतर गोळा झालेला काळा पैसा सर्वसामान्यांच्या जनधन खात्यात वितरित केला जाणार आहे का याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यावे, असा टोलाही अहिर यांनी लगावला.
नोटाबंदीच्या निर्णयाच्या विरोधात देशभरात ठिकठिकाणी आयोजित केलेल्या या आक्रोश मोर्चा आणि निषेध सभांंमध्ये विरोधातील तब्बल चौदा पक्ष सहभागी झाले होते. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास मुंबईत निघालेल्या आक्रोश मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार मिलिंद कांबळे, महिला आघाडी अध्यक्ष सुरेखा पेडणेकर, आसिफ भामला आणि संतोष धुवाळी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.